लोकमत न्यूज नेटवर्कजालना : भारत निवडणूक आयोगाचे या निवडणुकीचे ब्रीदवाक्य सुलभ निवडणुका असून सोबतच एकही मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी शहरासह खेड्यापाड्यातील प्रत्येक नागरिकांपर्यंत विविध प्रकारे जनजागृती स्वीप उपक्रमांतर्गंत करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून शाळेतील मुलांमार्फत त्यांच्या पालकांकडून ४० हजार ‘संकल्प पत्र’ जालना तालुक्यातील १७ केंद्रांसह शहरातील शाळांंमधून शुक्रवारपासून भरुन घेण्यास सुरुवात झाल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी तथा तालुका स्वीप नोडल अधिकारी बाळासाहेब खरात यांनी दिली.जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजीव नंदकर, उपविभागीय अधिकारी केशव नेटके, तहसीलदार महेश सुधळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील संकल्प पत्र जालना तालुक्यातील मुलांमार्फत पालकांपर्यंत पोहोचविले जात असून या पत्रात विद्यार्थांची व पालकांची सविस्तर माहिती विचारण्यात आली आहे. सोबतच आगामी लोकसभा निवडणुकीत धर्म, जात, वंश व भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता निर्भयपणे मतदान करण्याचा व लोकशाही बळकटीकरणाचा संकल्प करत आहोत, असा संदेश घराघरात पोहोचविला जातोय.दरम्यान, मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी हा उपक्रम जिल्हाभरात राबविला जात आहे. जिल्ह्यातील प्रत्येक शाळेतील मुलांकडून हे पत्र भरुन घेतल्या जात आहे. तरी पालकांनी हे पत्र भरुन आपल्या पाल्याकडे द्यावे, असे आवाहन ही निवडणूक विभागाकडून करण्यात आले आहे.यावेळी पुढे बोलतांना खरात म्हणाले की, १ एप्रिलपर्यंत सर्व संकल्प पत्र भरुन परत घेतले जाणार असून, नंतर ते तालुका स्वीप कक्षात ठेवले जातील असे त्यांनी सांगितले. जालना तालुक्यातील एका शाळेत विद्यार्थ्यांना पत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांसह पालकांची मोठ्या उपस्थिती होती.
४० हजार संकल्प पत्राद्वारे जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 12:36 AM