लोकमत न्यूज नेटवर्कजाफराबाद : जाफराबाद नगर पंचायतची निमखेडा महादेव मेळातील खडकपूर्णा बाधित क्षेत्रात असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठा विहिरीने तळ गाठला आहे. त्यामुळे नगर पंचायत समोर पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. येथून पुढे निर्माण होणा-या पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी मुख्याधिका-यांनी जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांच्याकडे नागरिकांची तहान भागविण्याकरिता निवेदन देऊन टँकरची मागणी केली आहे.नगर पंचायतीच्या पदाधिका-यांनी जिल्हाधिकारी जोंधळे यांची भेट घेऊन या विषयीचे निवेदन सादर केले आहे. जाफराबाद शहराचा विस्तार वाढला आहे. त्यामुळे पाणी समस्यांवर मात करण्यासाठी कायमस्वरूपी उपाय न करता तात्पुरती योजना टाकून काम भागविण्यात येत आहे. गाव अंतर्गत जलवाहिनी ही जुनी असल्याने ठिकठिकाणी गळती आहे. त्यामुळे येणारे पाणी हे शेवटच्या घटकापर्यंत पोहोचत नाही. म्हणून अधिक पाणी टंचाई वाढत आहे.वस्तीत वाढ झाली आहे. पाणी साठविण्याकरिता लागणारे जलकुंभ तेच आहे. लोकसंख्या दृष्टिकोनातून साठवणूक क्षमता वाढविण्याची आवश्यकता आहे. नगर पंचायत होऊन दोन वर्षे पूर्ण झालीे. परंतु अपेक्षित निधीअभावी भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यास अडचणी येत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. पाणीटंचाईमुळे सध्या रहिवाशांना १० ते १५ दिवसांनंतर पाणी मिळत आहे. आगामी काळात टंचाईच्या झळा अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीने तळ गाठला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 1:08 AM