जालना : जिल्ह्यात सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे बाजारपेठेतील भाजीपाल्याची आवक घटली आहे. त्यात पितृपंधरवाड्यात भोपळ्यालाही मागणी वाढल्याने बाजारपेठेतील दर ४० रुपये किलोवर गेले आहेत. तर फेरीवाल्यांकडून घरासमोर चक्क ६० रुपये किलोने भोपळा विक्री होत आहे.
जिल्ह्याच्या विविध भागांत मागील काही दिवसांपासून सातत्याने पाऊस पडत आहे. पडणाऱ्या पावसामुळे खरिपातील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या अतिवृष्टीचा फटका भाजीपाल्याच्या उत्पादनालाही बसला आहे. परिणामी, बाजारपेठेत नियमित होणारी भाजीपाल्याची आवक मंदावली आहे. भाजीपाल्याची आवक मंदावल्याने बाजारपेठेतील दरही काही अंशी वाढले आहेत. तर घरासमोर भाजीपाला विक्री करणारे फेरीवाले अधिकचा दर घेत आहेत.
व्यापारी काय म्हणतात?
सध्या बाजारपेठेत भाजीपाल्याची होणारी आवक मंदावली आहे. त्यामुळे दर काहीसे वाढले आहेत. शिवाय ग्रामीण भागातून भाजीपाला आणून शहरी भागात विक्री करायचा म्हटले की वाहतुकीचा खर्च वाढतो. भाजीपाल्याच्या साठवणुकीसाठीही खर्च करावा लागतो. त्यामुळे आम्हाला बाजारपेठेत काही प्रमाणात दर वाढवून भाजीपाल्याची विक्री करावी लागते.
- नितीन चव्हाण
भाजीपाल्याची मुख्य बाजारपेठेतून किंवा ग्रामीण भागातून खरेदी करावी लागते. त्याची साठवणूक, वाहतूक यावरही व्यापाऱ्यांचा खर्च होतो. अतिवृष्टीचा परिणामही भाजीपाला उत्पादनावर झाला आहे. त्यामुळे काही प्रमाणात दर वाढले आहेत. फेरीवाले शहरातील विविध भागांत फिरून भाजीपाला विक्री करतात. त्यामुळे त्यांच्याकडून काहीसी दरवाढ होते.
- प्रकाश जईद
अर्धा-एक किलोसाठी बाजारात कोण जाणार?
सध्या सातत्याने पाऊस पडत आहे. त्यामुळे मुख्य बाजारपेठेत जाऊन भाजीपाला खरेदी करताना मोठी कसरत करावी लागते. त्यात पाऊस आला की मोठी गैरसोय होते. त्यामुळे बहुतांशवेळी आम्ही घरासमोर येणारा भाजीपाला खरेदी करण्यावर भर देतो. त्यामुळे भाजीपाला आणण्यासाठी बाजारपेठेत जाण्या- येण्याचा वेळ वाचतो शिवाय इतर त्रासही कमी होतो.
- दीपाली खवल
बाजारपेठेपेक्षा फेरीवाले अधिक दराने भाजीपाला विक्री करतात. कोरोनामुळे अनेकांची आर्थिक स्थिती कोलमडली आहे. त्यात इंधनासह इतर साहित्याची दरवाढ होत असल्याने आर्थिक बजेट पूर्णत: कोलमडले आहे. असे असले तरी भाजीपाला खरेदी करावाच लागतो. ही बाब पाहता फेरीवाल्यांनी अधिकचा दर घेऊ नये.
- रागिणी राखे
मागणी वाढली....
सध्या पितृपंधरवाडा सुरू असून, या काळात भाजीपाल्याला अधिक मागणी वाढली आहे.
वाढलेली मागणी आणि बाजारपेठेतील घट यामुळे दरात वाढ होत आहे.
बाजारपेठेपेक्षा फेरीवाले अधिकचा दर घेत असल्याचे दिसून येते.