बाबासाहेब म्हस्के/जालना : जिल्ह्यातील २५ गावांमधून जाणा-या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी आतापर्यंत १५१ हेक्टर ३८ गुंठे जमीन खरेदीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र गुंडेवाडी, जामवाडी शिवारातील प्रस्तावित स्मार्ट टाऊनशिपमध्ये येण्यास स्थानिक उत्सुक नसल्याने टाऊनशिप होणार की नाही, याबाबत सध्या तरी अनिश्चितता असल्याचे सूत्रांनी सांगितले.बदनापूर व जालना तालुक्यातील एक हजार १५४ शेतक-यांच्या ४४० हेक्टर जमिनी नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी संपादित केली जाणार आहे. यामध्ये जालना तालुक्यातील ७११ तर बदनापूर तालुक्यातील ४४२ शेतक-यांचा समावेश आहे. आतापर्यंत जालना तालुक्यातील अहंकार देऊळगाव, नंदापूर, थार व बदनापूर तालुक्यातील नजीक पांगरी, गेवराई बाजार, अकोला देव या गावांमधील २९६ खरेदीखते पूर्ण झाली असून, १५१ हेक्टर तीन गुंठे हेक्टर जमिनीचे संपादन पूर्ण झाले आहे. दोन्ही तालुके मिळून अद्याप सुमारे साडेतीनशे हेक्टर जमिनीचे संपादन करण्याचे रस्ते विकास महामंडळाचे नियोजन आहे. आतापर्यंत झालेल्या खरेदी-विक्री प्रक्रियेत महामंडळाकडून शेतकºयांना सुमारे दीडशे कोटी रुपयांचा मोबदला देण्यात आला आहे. मोबदला रक्कम थेट शेतक-यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जात आहे. दरम्यान, शहरी भागात येत असलेल्या जामवाडी व श्रीकृष्णनगर परिसरातील जमिनीचे दर निश्चितीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. दोन दिवसांत संबंधित गावातील शेतक-यांना जमिनीच्या दराबाबत माहिती दिली जाईल, असे रस्ते विकास महामंडळाच्या शिबीर कार्यालयातील तहसीलदार एल.डी. सोनवणे यांनी सांगितले.----------------
समृद्धी महामार्गासाठी दीडशे हेक्टर जमिन खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2018 12:35 AM