लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना शहरातील बाजार समितीच्या मैदानात सुरू केलेल्या सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्रावर ७५ हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. अद्यापही मोठ्या प्रमाणावर कापसाची आवक सुरू आहे. जालन्यासह परतूर, घनसावंगी, मंठा बदनापूर आदी ठिकांणी देखील कापसाची खरेदी जोरात सुरू असल्याचे सांगण्यात आले. जालना केंद्रावर जवळपास ४१ कोटी रूपयांची कापूस खरेदी झाल्याची माहिती सीसीआयचे अधिकारी ठाकरे यांनी दिली.यंदा परतीच्या पावसामूळे कपाशीवर परिणाम होईल असे वाटले होते. परंतु पाहिजे तेवढा फटका या पावसाचा न बसल्याने शेतकऱ्यांना तारले आहे. शेतकऱ्यांचे पांढरे सोने म्हणून ओळख असलेल्या कपाशीचे उत्पादन अद्यापही सुरूच आहे. परंतु आता कृषी विभागाने सूचना दिल्यानुसार फरदड कापूस घेऊ नये जेणेकरून बोंड अळीची पुन्हा उत्पती होईल. ही बाब खरी असली तरी आजही कापूस वेचणीसाठी मजुरांची कमतरता कायम असल्याचे दिसते.जालना येथील सीसीआयच्या मोंढ्यातील केंद्रावर दीड महिन्यात ७५ हजार क्विंटल कापूस खरेदी झाला असला तरी आणखी एवढाच कापूस येथे खरेदी होईल अशी चिन्ह आहेत. यंदा हमीभाव चांगला मिळत असून, तो पाच हजार ५०० रूपये दिला आहे. त्यातच खाजगी व्यापा-यांकडून पाच हजार रूपयांचा भाव मिळत असल्याचे सांगण्यात आले. त्यामूळे शेतकरी हा त्यांचा कापूस सीसीआयकडेच विक्री करण्यास प्राधान्य देत असल्याचे ठाकरे म्हणाले.सीसीआयकडून खेरदी करण्यात येणारा कापूस हा जर १२ टक्केपेक्षा अधिक ओला असेल तो नाकारला जात आहे. परंतु असे असतांना कापसातील सरकीत अनेक जिनिंगमध्ये हा ओलावा थेट १८ टक्यांवर जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.कापूस जर केवळ १२ टक्केच ओला असेल, तर सरकी ही त्यापेक्षा कमी ओली असायला हवी असे काहींचे म्हणणे आहे. या संदर्भात ठाकरे यांनी असे शक्य नसल्याचे सांगितले.
जालन्यात ४१ कोटी रुपयांची कापूस खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2020 1:01 AM