लोकमत न्यूज नेटवर्कजालना : आता निवडणुका संपल्या आहेत. त्यामुळे राजकीय मतभेद बाजूला ठेवून जालना शहर व ग्रामीण भागाचा विकास साधण्यावर आपण लक्ष केंद्रित करणार आहोत. यासाठी सत्ताधारी पक्षातील जे- जे नेते विकास निधी देण्यास मदत करतील, त्यांचे आपण सर्व सहकार्य घेऊन सर्वांगीण विकासाकडे लक्ष देणार असल्याचे प्रतिपादन आ. कैलास गोरंट्याल यांनी केले.जालना नगर परिषदेच्या वतीने घाणेवाडी जलाशय तुडूंब भरल्यानंतर या पाण्याचे शनिवारी पूजन करण्यात आले. यावेळी घाणेवाडी जल संरक्षण मंचसह रूक्मिणी परिवार, संस्कृती मंच, रोटरी क्लब, लायन्स क्लबचे पदाधिकारी यांचीही उपस्थिती होती. प्रारंभी उद्योजक सुनिल रायठठ्ठा यांनी या ऐतिहासिक तलावाचे जालन्याची तहान भागविण्यासाठीचे महत्त्व विषद करून याचे जतन करण्याचे आवाहन केले. पुढे बोलताना कैलास गोरंट्याल म्हणाले, जायकवाडी येथून जरी योजना केली आहे. तरी देखील घाणेवाडी जलाशयातून विना विद्युत खर्चाचे पाणी पुरविले जाते. त्यामुळे याकडे आपले जातीने लक्ष राहणार आहे. मध्यंतरी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी जालन्याच्या विकासासाठी भरीव निधी दिला. थिंक टँक स्थापन करणारजालना शहराचा विकास नेमका कशा पध्दतीने केला जावा, यासाठी नागरिकांमधून सूचना मागविण्यात येतील, या सूचनांवर त्या- त्या विभागातील तज्ज्ञांचे मत आणि मार्गदर्शन घेतले जाईल. यासाठी रोटरी क्लब, लायन्स क्लब, रूक्मिणी परिवार, संस्कृती मंच यासह शहरातील अन्य सामाजिक व्यक्ती आणि संस्थांना सोबत घेऊन थिंक टँक स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा आ. कैलास गोरंट्याल यांनी यावेळी केली.
राजकीय मतभेद बाजूला ठेवून विकासाला प्राधान्य देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2019 12:52 AM