लोकमत न्यूज नेटवर्कजालना : वैद्यकीय महाविद्यालयीन शिक्षण घेतानाच आयुष्यभर एकमेकांची साथ देण्याच्या आणा-बाका घेतल्या आणि १९९३ मध्ये प्रेमाचे रूपांतर विवाहामध्ये झाले. गेल्या २६ वर्षापासून आम्ही संसारात रमलो आहोत. असे असले तरी एकमेकांचे हक्क आणि कर्तव्यामध्ये कुठेच बाधा येऊ देत नाही.महिला म्हटले की तिला समाजात आणि घरातही दुय्यम स्थान दिले जाते. हे कुठे तरी बदलण्याची गरज आहे. वडील डॉ. कुद्रीमोती हे मराठवाड्यातील पहिले हृदयरोग तज्ज्ञ होते. आई देखिल डॉक्टर असल्याने घरातूनच वैद्यकीय शिक्षणाचे बाळकडू मिळाले. माझी स्वत:ची इच्छा डॉक्टर होण्याची नव्हती. परंतू वडिलांच्या आग्रहाखातर आपण हे क्षेत्र निवडले आणि त्याचे आज चीज झाल्याचे समाधान आहे. आजोबा हे पैठण येथील नाथ मंदिराशी संलग्न असल्याने आपोआपच घरात अध्यात्मिक वातावरण होते. वैद्यकीय शिक्षण घेत असताना डॉ. संजय राख यांच्याशी प्रथम मैत्री आणि नंतर मैत्रीचे रूपांतर कधी पे्रमात झाले हे कळले नाही. परंतू, जेव्हापासून आम्ही चांगले मित्र झालो. त्यावेळीपासूनच समाजासाठी काहीतरी केले पाहिजे या हेतूने सासरी देखील तसेच वातावरण मिळाले. सासरे हे राजकारणात असतानाही वैद्यकीय क्षेत्राची त्यांनी नाळ तुटू दिली नाही. सासूबाई देखील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ होत्या. त्यामुळे आपोआपच आम्ही याच व्यवसायात राहण्याचा निर्णय घेतला. परदेशात जाऊन गलेलठ्ठ पगाराची नोकरी करण्यापेक्षा आई-वडिलांचा व्यवसाय पुढे वाढविण्याचा निर्णय आम्ही घेतला. आज दीपक हॉस्पिटलच्या माध्यमातून अनेक गरजू रूग्णांना सेवा देण्याची संधी मिळाल्याने आम्ही समाधानी आहोत. महिलांना समान वागणूक देण्याठी प्रत्येकाने जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत. कुठलेही बाब निश्चित करताना महिलांना विश्वासात घेऊन ती केली पाहिजे. तिला तिच्या मनाप्रमाणे वागण्याची मोकळीक असणेही गरजेचे आहे. नसता क्षुल्लक कामासाठी देखील कुणाला तरी विचारल्याशिवाय ते करायचे नाही. असे बंधन नसले पाहिजे. महिलांना मोठ्या प्रमाणावर संधी आहेच. त्या संधीचे त्यांनी सोने केले पाहिजे. समाजात वावरताना निडरपणे वावरले पाहिजे. आपण एक महिला आहोत म्हणून खचून जाण्याऐवजी महिला देखील पुरूषांप्रमाणेच सर्वच क्षेत्रात धडाडीचे कार्य करू शकतात.