शेषराव वायाळ
परतूर : खरिपातील हातचे गेलेले पीक, उसनवारी करून केलेली रब्बी पिकांची पेरणी आणि आता पीककर्ज घेण्यासाठी चक्क पहाटे चार वाजल्यापासून बँकेच्या दारात उभे राहण्याची आलेली वेळ... ही व्यथा आहे, परतूर व परिसरातील शेतकऱ्यांची! त्यामुळे ‘उध्दवा, अजब तुझे सरकार...’ असे म्हणण्याची वेळ कडाक्याच्या थंडीत रांगेत उभे राहिलेल्या शेतकऱ्यांवर आली आहे.
शेतकऱ्यांच्या नशिबी आस्मानी- सुल्तानी संकटे पूजलेली! यंदा खरिपाच्या प्रारंभी चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. मात्र, नंतर अतिवृष्टी झाली आणि शेतकऱ्यांच्या स्वप्नांवरच पाणी पडले. खरिपातील उत्पन्न सोडाच पण केलेला खर्चही शेतकऱ्यांच्या हाती पडला नाही. शासनाने मदतीची घोषणा केली. मात्र, अद्यापही असंख्य शेतकऱ्यांच्या हातात ही रक्क्म आलेली नाही. त्यामुळे परतूर परिसरातील शेतकऱ्यांनी उसनवारी करून, सावकारी कर्ज काढून रब्बीतील पिकांची पेरणी केली.
पीककर्ज मिळावे यासाठी शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियात अनेक शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केले. बँकेत चकरा मारूनही अद्याप अनेकांना कर्ज मिळाले नाही. कर्ज सोडा पण, बँकेत प्रवेश मिळणेही मुश्किल झाले. त्यामुळे शेतकरी चक्क कडाक्याच्या थंडीत पहाटे ४ वाजताच स्टेट बँक ऑफ इंडियाच्या परतूर शाखेसमोर रांगा लावू लागले आहेत. त्याला कारण म्हणजे बँकेने तडजोड करणे व नवीन पीककर्ज देण्यासाठीची वेळ सकाळी १० ते २ केली आहे. परिणामी आपला नंबर लवकर लागावा म्हणून हे शेतकरी बँकेसमोर रांगा लावत आहेत. एकरकमी तडजोड केल्यानंतर शेतकऱ्यांना पुन्हा नवीन कर्ज देण्यात येईल असेही अश्वासन देण्यात येत आहे. त्यामुळे पीककर्ज देऊन केलेली उसनवारी, सावकारी कर्ज फेडता येईल, अशी आशा या शेतकऱ्यांना आहे. पहाटेच्या सुमारास कडाक्याच्या थंडीत रांगेत थांबलेले शेतकरी मात्र, उध्दवा अजब तुझे सरकार... असे म्हणत बँक प्रशासन आणि प्रशासनाच्या दुर्लक्षित भूमिकेबाबत संताप व्यक्त करीत आहेत.
चौकट
कचऱ्यापासून पेटविल्या जातायेत शेकोट्या
पीककर्जासाठी पहाटे ४ पासून शेतकऱ्यांना रांगेत उभे रहावे लागत आहे. कडाक्याच्या थंडीमुळे बँक परिसरात पडलेला कचरा गोळा करून शेकोट्या पेटविल्या जात आहेत. या शेकोटीची उब पहाटेच्या सुमारास शेतकऱ्यांना आधार देत आहे. मात्र, पहाटेची थंडी अंगावर झेलूनही पीककर्ज मिळेल की नाही ? अशी चिंता या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे.
रात्रीपर्यंत बँकेचे व्यवहार
बँकेची एकरकमी तडजोड योजना सुरू आहे. शेतकरी सध्या पहाटेच येऊन रांगा लावत आहेत. ही कामे करून आम्हाला दैनंदिन कामे, व्यवहार रात्रीपर्यंत पहावे लागतात.
महेंद्र डोंगरे
शाखा व्यवस्थापक