टेंभुर्णी : मागील पंधरवड्यापासून सुरू असलेल्या सततच्या ढगाळ वातावरणामुळे टेंभुर्णीसह परिसरातील रब्बी हंगाम धोक्यात आला आहे. या वातावरणामुळे गहू, हरभरा, शाळू ज्वारी आदी पिकांवर रोगराईचा मोठा प्रादुर्भाव होण्याची शक्यता शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे.
टेंभुर्णी परिसरात मागील १५ दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. शिवाय अनेकदा सकाळच्या वेळी दाट धुके पडत आहे. पिकांच्या वाढीसाठी पोषक नसलेल्या या वातावरणाचा रब्बी पिकांवर मोठा परिणाम होत आहे. शाळू ज्वारीवर मावा व चिकट्याचा प्रादुर्भाव दिसून येत आहे, तर गव्हाच्या पिकावर तांबोरा पडत आहे. याशिवाय हरभऱ्यावर घाटेअळीचा प्रादुर्भाव वाढत आहे. सततच्या थंड - दमट वातावरणामुळे रब्बी उत्पादनात मोठी घट येण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे. यातच भर म्हणून टेंभुर्णीसह परिसरात चार दिवसांपूर्वी आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे अनेक शेतांमध्ये शाळू ज्वारीचे पीक आडवे झाले आहे.
विशेष म्हणजे ढगाळ वातावरणाचा आंब्याच्या मोहोरावरही विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे टेंभुर्णीसह परिसरातील गणेशपूर, सातेफळ, नळविहरा आदी ठिकाणचे केशर आंबा उत्पादक शेतकरीही अडचणीत आले आहेत.
फोटो ओळ : जोरदार वाऱ्यामुळे टेंभुर्णी येथील शेतकरी संतोष शिंदे यांच्या शेतातील शाळू ज्वारी आडवी झाली आहे.