लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात दोन महिन्यांपूर्वी गारपिटीने झालेल्या नुकसानीतून शेतकरी सावरत असताना शनिवारी काही भागात पुन्हा वादळी वाऱ्यासह बेमोसमी पाऊस झाला. टेंभुर्णी शिवारात तुरळक गारपीट झाली. काही ठिकाणी शेडनेटचेही नुकसान झाले. बदलत्या वातावरणामुळे जिल्ह्यातील फळबाग उत्पादक शेतकरी धास्तावला आहे.हवामान विभागाने सहा एप्रिलला मराठवाड्यात गारपीट होण्याचा अंदाज वर्तवला होता. दरम्यान, शनिवारी जिल्ह्यात दुपारनंतर ढगाळ वातावरण होते. सायंकाळी पाचनंतर काही भागात वादळी सुटले. जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णीसह गणेशपूर, अकोलादेव, डोलखेडा, खानापूर, काळेगाव, वरखेडा, सावरगाव, कुंभारझरी, पापळ आदी भागात सायंकाळी अचानक आलेला पाऊसाने शेतक-यांना ११ फेब्रुवारीच्या गारपिटीची आठवण झाली. बेमोसमी पाऊस व तुरळक गारपिटीमुळे आंबा, चिकू या फळबागांंना फटका बसला. अनेक ठिकाणी उन्हाळी बाजरीही आडवी झाली. नेट-शेडचेही नुकसान झाले. वीटभट्टी उत्पादकांनाही या पावसाचा फटका बसला.गणेशपूर येथील केशर आंबा उत्पादक माधवराव अंधारे, टेंभुर्णी येथील गजेंद्र खोत, शंकर खोत, मुकेश खोत, धीरज काबरा, बाबूराव जाधव, अर्जुन मुनेमानिक यांच्या केशर आंबा बागेसह गावरान आंब्याचेही नुकसान झाले. टरबूज व खरबूज पिकालाही याचा फटका बसला आहे. खानापूर परिसरात शेतातील बाजरी आडवी झाली. परतूर तालुक्यातील शिंगोना, बामणी, आनंदवाडी, पैंजणा, आंबा, डोल्हारा, मसला, रोहिणा, वाडोणा, नागापूर आदी भागाता सायंकाळी दहा ते पंधरा मिनिटि रिमझिम पाऊस झाला. मंठा तालुक्यातील विजेच्या कडकडाटासह तासभर पाऊस झाला. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले होते. अंबड तालुक्यातील अंकुशनगर, महाकाळा, भगवाननगर, चर्मापुरी, मेघगर्जनेहस हलका पाऊस झाला. जामखेड शिवारातही पावसाने हजेरी लावली. भोकरदन तालुक्यात काही भागात वादळी वा-यामुळे भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. जालना तालुक्यातही सायंकाळी ढगाळ वातावरणामुळे हवेत गारवा निर्माण झाला होता.घनसावंगी तालुक्यातील घनसावंगी, चिंचोली, राजेगाव, पिरगेपवाडी, खडकावाडी, घोन्सी खुर्द, मांदळा, देवनगर, देवडी, हादगाव शिवारात सायंकाळी अधून-मधून तासभर हलक्या सरी कोसळत होत्या.त्यामुळे रस्ते ओलेचिंब झाले होते.
बळीराजाच्या भाळी पुन्हा अवकाळी...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2018 12:48 AM