लोकमत न्यूज नेटवर्कपारध / दानापूर : पारधसह परिसरात शनिवारी पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे येथील जनता विद्यालयाच्या प्रांगणात पाणी साचल्याने तळ्याचे स्वरूप आले होते. सतत पडणाऱ्या पावसामुळे दानापूर येथील जुई धरणातील पाणीपातळीत १३ फूट वाढ झाली आहे.भोकरदन तालुका व परिसरात मागील काही दिवसांपासून सातत्याने पाऊस पडत असून, पावसामुळे बळीराजा सुखावला आहे. पारध येथेही पावसाचा जोर कायम आहे. शनिवारी दुपारी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटात दमदार पाऊस झाला. या पावसामुळे जनता विद्यालयाच्या प्रांगणात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. पावसाचा जोर वाढल्याने पावसाचे पाणी शाळेचे कार्यालय, शिक्षक कक्ष आणि वर्ग खोल्यांमध्ये शिरले. त्यामुळे कार्यालयातील कागदपत्रे भिजली होती. तसेच जिल्हा परिषद शाळेच्या आवारात देखील मोठया प्रमाणात पाणी साचले होते. तर या पावसामुळे येथील रायघोळ नदीला पाचव्यांदा पूर आला होता. पारधसह परिसरातील गावांमध्येही दमदार पाऊस झाला. दानापूर येथील जुई धरणाची पाणीपातळी १३ फुटांनी वाढली आहे. प्रकल्पातील पाणीसाठा वाढल्याने २५ गावांचा पाणीप्रश्न मार्गी लागला आहे. पावसाचा जोर असाच राहिला तर हा प्रकल्प भरण्याची शक्यता आहे. दरम्यान, जळगाव सपकाळ परिसरात शनिवारी दमदार पाऊस झाला. शेलूद येथील धामणा धरणाची पाणीपातळीही वाढली आहे.
शाळेत घुसले पावसाचे पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2019 12:37 AM