लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यातील आठ तालुक्यांपैकी सहा तालुक्यात पावसाचे दमदार पुनरागमन झाले आहे. भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यावर मात्र, अवकृनपा राहिल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. येत्या आठवडाभरात या दोन तालुक्यात समाधानकारक पाऊस न झाल्यास दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर येणार आहे. शनिवारी रात्री जालना ग्रामीण महसूल मंडळात अतिवृष्टी झाली असून, यामुळे सामनगावसह अन्य गावामध्ये शेतक-यांच्या शेतात पाणी साचले आहे.जालना तालुक्यातील सामनगाव व परिसरात शनिवारी रात्री थेट १२१ मिलिमीटर पाऊस पडला. जोरदार झालेल्या पावसामुळे देवलाल डोंगरे यांची विहिर पूर्णपणे खचली असून, अनेकांच्या शेतात पाणी तुंबल्याने त्याचा निचरा न झाल्याने पेरणी वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान रविवारी रात्री जालना, बदनापूर, परतूर तालुक्यात चांगला पाऊस झाला. भोकरदन शहर व परिसरात १५ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद असून, रविवारी रात्री बदनापूर तालुक्यात ३६ मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद आहे. अंबड तालुक्यातही रविवारी रात्री जोरदार पाऊस झाल्याने वडीगोद्री सर्कलमध्ये अतिवृष्टी झाल्याचे सांगण्यात आले.
भोकरदन, जाफराबादवर अवकृपा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 1:11 AM