लोकमत न्यूज नेटवर्कजालना : यंदा अपेक्षित पाऊस न झाल्याने जालना जिल्ह्यातील ६४ पैकी ३८ प्रकल्प कोरडेठाक आहेत. तर २१ प्रकल्पांत मृत पाणीसाठा असून, जिल्ह्यातील इतर प्रकल्पांमध्ये केवळ ७ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. परिणामी भर पावसाळ्यात शहरी, ग्रामीण भागातील पाण्याचा प्रश्न आजही कायम आहे.जालना जिल्ह्यात आजवर वार्षिक सरासरीच्या २८४.४ मिमी पाऊस झाला आहे. पावसाळ्याची तीन महिने लोटत आली तरी मोठा पाऊस झालेला नाही. जालना तालुक्यात २३२ मिमी, बदनापूर- २७१ मिमी, भोकरदन- ३९६ मिमी, जाफराबाद- ३१८ मिमी, परतूर- २८१ मिमी, मंठा- २७५ मिमी, अंबड- २५२ मिमी, तर घनसावंगी तालुक्यात २४३ मिमी पाऊस झाला आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी ६८८.२१ मिमी आहे. मात्र, आजवर केवळ २८४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्याही मोठा पाऊस झालेला नाही. केवळ रिमझिम पावसाने हजेरी लावली आहे. परिणामी जिल्ह्यातील प्रकल्पांची तहान आजही कायम आहे. जिल्ह्यात ७ मध्यम प्रकल्प आहेत.पैकी एक मध्यम प्रकल्प कोरडाठाक असून, चार प्रकल्प जोत्याखाली आहेत. तर दोन प्रकलपांमध्ये ७६ टक्क्यांहून अधिक उपयुक्त पाणीसाठा आहे. जिल्ह्यात ५७ लघू प्रकल्प आहेत. पैकी ३८ प्रकल्प पूर्णत: कोरडेठाक आहेत. तर २१ प्रकल्पातील पाणीसाठा मृतावस्थेत आहे. केवळ दोन प्रकल्पात ० ते २५ टक्क्यांच्या मध्ये पाणी असून, एका प्रकल्पात २६ टक्क्यांपेक्षा अधिक उपयुक्त पाणीसाठा आहे. अपुऱ्या पावसामुळे भविष्यात पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर होण्याची चिन्हे आहेत.पावसाअभावी प्रकल्पांमध्ये पाण्याचा ठणठणाट असून, नदी-नालेही कोरडेठाक आहेत. प्रकल्पातच पाणी नसल्याने अनेक गावच्या पाणीपुरवठा योजना बंद पडलेल्या आहेत. गावा-गावातील पाणीप्रश्न कायम असून, टँकर, अधिग्रहणाद्वारे गावांची तहान भागविली जात आहे.मागील अनेक दिवसांपासून पाऊस झालेला नाही. परिणामी रिमझिम पावसावर तग धरलेल्या पिकांनी माना टाकल्या आहेत. पावसाअभावी जिल्ह्यातील खरिप हंगामातील पिके धोक्यात आला असून, प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे करावेत, अशी मागणी होत आहे.
पावसाळा संपत आला ३८ प्रकल्प तहानलेलेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 1:03 AM