लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथील राजा बाग शेर सवार यांच्या उरुसाला शनिवारपासून सुरुवात झाली. तीन दिवस चालणाऱ्या या उरुसाचे हे ७४० वे वर्ष आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.उरुसानिमित्त शनिवारी दर्गा परिसरात सकाळपासूनच मुस्लीम भाविकांची गर्दी पहायला मिळाली. सकाळी साडेदहा वाजता खत्म ए खाजगान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सव्वा दोन वाजता कुराणाचे पठण करण्यात आले. तर सायंकाळी साडेपाच वाजता बजे खत्मे कादरिया, नुरी मेहफील, कुल शरीफ व संदल कार्यक्रम झाला. संदल कार्यक्रमात मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. ऊरुसानिमित्त परिसराला यात्रेचे स्वरुप आले आहे. दर्गा परिसरात मुस्लिम धर्म व सुफी संताच्या जीवनावरील पुस्तकांचे प्रदर्शनही लावण्यात आले आहे. दर्गा परिसरातील व्यवस्था व कार्यक्रमांचे चोख नियोजनासाठी २०० हून अधिक स्वयंसेवक परिश्रम घेताना दिसले. यामध्ये पेंशनपुरा, टट्टुपुरा, चिश्चिता ग्रुप, मणियार मोहल्ला, खादरिया ग्रुप, लक्कड कोट, शेर सवार नगर इ. परिसरातील मुस्लिम युवकांनी सहभाग घेतला.
राजा बाग शेरसवार उरुसाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 12:51 AM