जिल्ह्यातील चारही नगर पंचायतींच्या निवडणुका काँग्रेस पक्षाने स्वतंत्रपणे लढवाव्यात, असा निर्णय जालना जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सोमवारी रोजी पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला.
जालना जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस पक्षाच्या १३६ व्या स्थापना दिवस सोमवारी येथील भगवान सेवा मंगलकार्यालयात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यस्थानी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख हे होते.
याप्रसंगी प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी डॉ. संजय लाखे पाटील, कल्याण दळे, विजय कमड, संत्सग मुंढे, माजी जिल्हाध्यक्ष आर. आर. खडके, पक्षनिरीक्षक अॅड. अनंत वानखेडे, अशोक पडघन, जिल्हा कार्यध्यक्ष राजेंद्र राख, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख मेहमूद, प्रभाकर पवार, राम सांवत, एकबाल कुरेशी आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त जिल्हाध्यक्ष देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी बैठकीच्या सुरुवातीला जिल्ह्यातील बदनापूर, जाफराबाद, मंठा आणि घनसांवगी नगर पंचायत निवडणुकीसंदर्भात तालुकाध्यक्ष नीळकंठ वायाळ, अण्णासाहेब खंदारे, सुरेश गवळी, विष्णू कंटोले, लक्ष्मण म्हसलेकर, शेख अनवर, जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा विमल आगलावे यांनी चारही नगर पंचायतींबद्दल आपल्या भाषणातून संपूर्ण माहिती देताना सांगितले की, काँग्रेस पक्ष तळागाळात पोहोचविण्यासाठी नगर पंचायतींच्या निवडणुका काँग्रेस पक्षाने स्वबळावर लढवाव्यात. जिल्ह्यात चारही ठिकाणी काँग्रेस पक्षाची भरभक्कम स्थिती आहे आणि सामन्य कार्यकर्त्यांना उमेदावारी देताना न्यायाची भूमिका होईल. बैठकीच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना जिल्हाध्यक्ष देशमुख म्हणाले की, काँग्रेस पक्षाचा स्थापना दिवस आहे. पक्षाचे हे गौरवशाली वर्ष आहे, कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेता आगामी नगर पंचायतीच्या निवडवणुका काँग्रेस पक्ष स्वतंत्रपणे लढवील, अशी घोषणा देशमुख यांनी केली. आ. राजेश राठोड बोलताना म्हणाले की, कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाचा गौरवशाली आणि बलिदानाचा इतिहास सातत्याने आपल्या स्मरणात ठेवल्यास काँग्रेस कार्यकर्ता हा कधीच निराश राहणार नाही. जिल्ह्यातील चारही नगर पंचायत निवडणुकीत काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने मैदानात उतरेल, असे राठोड यांनी सांगून मंठा नगर पंचायतीच्या १७ जागा जिंकल्याशिवाय राहणार नाही, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
प्रास्ताविक राख यांनी केले. या बैठकीत राजेश काळे, विठ्ठलसिंग राजपूत, आनंद लोखंडे, गुरुमित सिंग सेना, राजेद्र जैस्वाल, चंद्राताई भांगडीया, सुषमाताई पायगव्हाणे, मंगलताई खाडेभराड, चंदाकांत रत्नपारखे, डॉ. विशाल धानुरे, किसन जेठे, फकिरा वाघ, अशोक उबाळे, राजू पवार, संतोष अन्नदाते, भाऊसाहेब सोळुके, शरद देशमुख, मोबीन खान, शिवाजी वाघ, शिवराज जावध, वैभव उगले, सुरेश बोरुडे आदींची उपस्थिती होती. जहिरयार खान, जुनेद खान, जावेद कुरेशी, अनस चाऊस, शबाब कुरेशी, कयूम कुरेशी आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहर काँग्रेस अध्यक्ष शेख मेहमूद यांनी केले, तर जिल्हा सरचिटणीस राम सांवत यांनी आभार मानले.