काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी राजाभाऊ देशमुख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 01:08 AM2019-01-28T01:08:04+5:302019-01-28T01:08:23+5:30
भोकरदनचे माजी नगराध्यक्ष राजाभाऊ भाऊसाहेब देशमुख यांची जालना जिल्हा कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली
लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन : भोकरदनचे माजी नगराध्यक्ष राजाभाऊ भाऊसाहेब देशमुख यांची जालना जिल्हा कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असुन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हे पद प्रथमच भोकरदन तालुक्याला मिळाले आहे़
कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे जिल्हा कॉग्रेसचे विद्यमान अध्यक्ष सुरेशकुमार जेथलिया यांनी राजाभाऊ देशमुख यांना अध्यपद देण्याबाबत शिफारस केल्यानंतर प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राज्यातील तेरा नवीन जिल्हा अध्यक्षांची निवड जाहीर केली. त्यात जालना जिल्हा कॉंग्रेसच्या अध्यक्षपदासाठी जिल्हा कार्यअध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्या नावाचा समावेश करण्यात आला. २३ जानेवारी रोजी रात्री उशिरा राष्ट्रीय कॉग्रेसचे सरचिटणीस खा़ के़सी़ वेणूगोपाल यांनी राज्यातील तेरा जिल्हाध्यक्षाच्या नवीन नियुक्या जाहीर केल्या आहेत.
या बद्दल प्रतिक्रिया देताना राजाभाऊ देशमुख म्हणाले की, काँग्रेसला जिल्ह्यात पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आपण सर्वांना सोबत घेऊ, तसेच आगामी निवडणुकीतही काँग्रेसचे वर्चस्व राखण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले.