जालना : प्रसिध्द कीर्तनकार ह.भ.प. इंदुरीकर महाराज आणि आपण शनिवारी एका कीर्तनात एकत्र होतो. व्यासपीठावर चर्चा करताना त्यांना कोरोना प्रतिबंधक लसीकरणाबाबत कीर्तनातून महत्त्व पटवून देण्याची विनंती केली आणि ती त्यांनी लगेचच मान्य केली, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
आज कोरोनाचे रुग्ण कमी आहेत, ही बाब सकारात्मक असून, त्याने थांबलेले जीवन पुन्हा पूर्वपदावर येत आहे. लसीसंदर्भात काही अफवा पसरविण्यात आल्याने लसीकरणाची गती कमी झाल्याचे दिसून येते. परंतु समाजातील मान्यवरांनी सांगितल्यास सामान्य नागरिक ऐकतात. त्यातच कीर्तनकार आणि प्रबोधनकारांनी लसीचे महत्त्व आणि गरज पटवून दिल्यास चांगले परिणाम होतील, यादृष्टीने इंदुरीकर महाराजांना विनंती केल्याचे टोपे म्हणाले.
आपण कीर्तनातून लसीकरणाबाबत जनजागृती करू, असा शब्द देऊन त्याचा श्रीगणेशाही इंदुरीकर महाराजांनी जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील वाकुळणी येथून केला. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याच्या वाढदिवसानिमित्त कीर्तन पार पडले.