लोकसभेच्या उमेदवारीला राजेश टोपेंची ‘ना-ना’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 12:26 AM2018-10-24T00:26:09+5:302018-10-24T00:27:21+5:30
काँग्रेससोबत आघाडी व्हावी ही आमची इच्छा आहे. असे झाल्यास जो मतदारसंघ काँग्रेसासाठी सुटला असेल तेथे राष्ट्रवादी काँग्रेसने मदत करावी आणि जो मतदारसंघ राष्ट्रवादीसाठी सुटला असेल तेथे काँग्रेसने आघाडीधर्म पाळावा असे सांगतानाच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजेश टोपे यांनाच आपण लोकसभेच्या मैदानात उतवल्यास कसे राहील असा सवाल केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अंकुशनगर : काँग्रेससोबत आघाडी व्हावी ही आमची इच्छा आहे. असे झाल्यास जो मतदारसंघ काँग्रेसासाठी सुटला असेल तेथे राष्ट्रवादी काँग्रेसने मदत करावी आणि जो मतदारसंघ राष्ट्रवादीसाठी सुटला असेल तेथे काँग्रेसने आघाडीधर्म पाळावा असे सांगतानाच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजेश टोपे यांनाच आपण लोकसभेच्या मैदानात उतवल्यास कसे राहील असा सवाल केला. या घोषणेचे उपस्थितांनी टाळ्या वाजवून स्वागत केले. मात्र, नंतर लगेचच टोपेंकडून ‘उमेदवारी नको’ अशी खुणवाखुणवी झाल्याने मोठा राजकीय गोंधळ उडाला.
मंगळवारी अजित पवार यांच्या हस्ते कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी कारखान्याच्या ३५ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी त्यांनी अनेक प्रश्नांवर रोखठोक मत व्यक्त केले. आगामी काळ हा निवडणुकीचा असल्याने सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. भाजप-सेनेला दूर ठेवण्यासाठी समविचारी पक्षांनी एकत्र यावे ही आमची इच्छा आहे. हा मतदारसंघ राष्टÑवादीला सुटल्यास राजेश टोपेंना उमेदवारी दिल्यास कसे राहिल, असा सवाल पवार यांनी उपस्थित केला. टोपे यांची उमेदवारी जाहीर करण्याचे हे व्यासपीठ नाही असे सांगून नंतर त्यांनी सारवासारवही केली. उमेदवारी कोणाला द्यायची याबाबतचा निर्णय हे पक्षाध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार घेतात, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. दरम्यान राजेश टोपे यांनी १९९६ ला जालना लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविली होती. परंतु त्यात ते पराभूत झाले होते. व्यासपीठावर माजी आ. अमरसिंह पंडित, माजी आ.चंद्रकांत दानवे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ.निसार देशमुख, जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष सतिश टोपे, युवकचे अध्यक्ष कपील आकात, रवींद्र तौर, बाळासाहेब वाकुळणीकर, संजय हर्षे, शिक्षण सभापती रघुनाथ तौर, प.स.सभापती लहाने, उपसभापती बाळासाहेब नरवडे, बाजार समितीचे सभापती सतीश होंडे, खरेदी विक्री संघाचे चेअरमन भाऊसाहेब कनके, समर्थ बँकेचे उपाध्यक्ष संजय कनके उपस्थित होते.
मराठवाड्यात यंदा दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. येथील खरीपाचे पीक गेले. अनेक ठिकाणी रबीच्या पेरण्या झाल्या नाहीत. परंतु, सरकार दुष्काळ जाहीर करण्यासाठी चालढकलपणा करीत असल्याचा आरोप अजित पवार यांनी केला.
कारखान्यांमुळे परिसरातील अर्थकारणावर मोठा प्रभाव पडतो. परिसराचा विकास होऊन आर्थिक उन्नती होते. कारखाने चांगले चालले तर शेतक-यांचे भविष्य उज्वल होऊन शेतकरी टिकेल आणि शेतकरी सुधारला तर राज्य सुधारेल यासाठी शेतकरी हा केंदबिंदू मानून काम करणे आवश्यक आहे.शेतकऱ्यांच्या ऊसाला जास्तीत जास्त भाव देण्यासाठी साखर उत्पादनाबरोबर, वीज निर्मिती, डिस्टीलरी, इथेनॉल यासारख्या उपपदार्थांची निर्मिती होणे आवश्यक असल्याचेही पवार यांनी सांगितले.
केंद्र सरकारसह शिवसेनेवर टीका
अजित पवार यांनी केंद्र सरकारच्या एकूणच धोरणावर टीकेची झोड उठविली. निरव मोदी, मेहूल चोक्सी, विजय मल्ल्या यांना हे केंद्र सरकार मदत करत आहे. मेहूल चोक्सीला तर एका केंद्रीय मंत्र्यांच्या जावयाने परदेशात जाण्यासाठी मदत केल्याचे पुढे आले आहे. संपूर्ण कर्जमाफी देण्यासाठी सरकार चालढकल करत आहे. तर कर्जमाफी हा घोटाळा असल्याची उपरती शिवसेनेला आता झाली आहे. एकूणच यात घोटाळा झाला असेल तर, तुम्ही देखील या सरकारचाच एक भाग आहात.
हे विसरून कसे चालेल असे सांगून, शिवसेनेचे नेते म्हणे आता २५ तारखेला अयोध्येला जाणार आहेत. त्यांनी अर्थात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचा नामोल्लेख न करता पवार म्हणाले की, ज्यांना आपल्या वडिलाचे स्मारक अद्याप बांधता आले नाही. हे अयोध्येत जाऊन काय दिवे लावणार, असा थेट आरोप केल्याने खळबळ उडाली. औरंगाबाद येथील महापालिकेत गेल्या २० वर्षापासून शिवसेनेची सत्ता आहे. त्यांना कचरा साफ करता आला नाही, ते राज्य काय चालवणार असा खोचक सवाल ही पवार यांनी केला.
शिवसेनेचे आंदोलन
शिवसेनेचे उपनेते लक्ष्मण वडले आणि डॉ. हिकमत उढाण यांनी मंगळवारी गळीत हंगमाच्यावेळी कारखाना परिसरात अचानक उपोषण केले. शेतकºयांचे ३५ कोटी रूपये हे कारखान्याने थकविल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी पोलीसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली. यावेळी पत्रकारांशी बोलतांना वडले व उढाण यांनी समर्थ साखर कारखान्याच्या व्यवस्थापनावर टीका केली.