हे रक्तदान शिबिर भारतीय शिक्षण प्रसारक मंडळ गेवराई आणि राष्ट्रमाता इंदिरा गांधी यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आले. अध्यक्षस्थानी माजी आ. डॉ. नारायण मुंढे होते. शिबिराचे उद्घाटन आमदार राजेश राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मनोज बागडी, जितेंद्र देहाडे, विजय कामड, पवन डोंगरे, नारायण वाढेकर आणि प्राचार्य डॉ. सुनंदा तिडके उपस्थित होत्या.
संसदरत्न राजीव सातव यांची जयंती युवक प्रेरणा दिन म्हणून साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक प्रा. सत्संग मुंढे यांनी केले. स्व. राजीव सातव यांचे विचार आणि काम करण्याची हातोटी ही सर्वांना प्रेरणा देणारी होती. त्यांचे विचार चिरंतर ठेवण्यासाठी आम्ही काम करत राहू असे मुंडे यांनी सांगितले.
जितेंद्र देहाडे यांनी, स्व. विलासराव देशमुख यांच्यानंतर मराठवाडा विभागाचा समर्थ नेता आपण गमवला आहे. त्यांचे सामान्य कार्यकर्त्याला दिशा आणि शक्ती देण्याचे गुण विलक्षण होते, असे सांगितले. कार्यक्रमाचे उद्घाटक राजेश राठोड यांनी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा खा. राहुल गांधी यांच्या आदेशानुसार स्व. राजीव सातव हे रांगेतील शेवटच्या सामान्य कार्यकर्त्याला बळ देण्याचे काम करत असत. स्वत:च्या वाढदिवसाच्या दिवशी दिल्ली येथे शेतकऱ्यांसाठी आंदोलन करणारे नेते हे राजीव सातवच असू शकतात अशा अनेक आठवणी त्यांनी सांगितल्या.
मनोज बागडी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. काँग्रेस पक्ष हा गोरगरिबांना दलित, वंचितांना सोबत घेऊन चालणारा पक्ष आहे आणि तोच पक्ष सर्वसामान्यांना न्याय देऊ शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सूत्रसंचालन प्रा. लहू दरगुडे यांनी केले. आभार संतोष साबळे यांनी मानले.
चौकट
अध्यक्षीय समारोप डॉ. नारायण मुंढे यांनी केला. स्व. राजीव सातव यांच्या वडिलांसोबत कार्यकर्ते म्हणून कार्य केले. त्यांच्या आई माजी मंत्री रजनीताई सातव यांच्या सोबतही काम केले. सातव परिवारासोबत पारंपरिक संबंधाच्या कौटुंबिक अठवणींना त्यांनी उजाळा दिला.