लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मावळा या शब्दानेच समाजामध्ये समानता आणण्याचे महानकार्य राजमाता जिजाऊ यांच्या काळात घडले आणि आठरा पगड जाती एका धाग्यात बांधल्या गेल्याचे प्रतिपादन आ. कैलास गोरंट्याल यांनी केले.समस्त ओबीसी समाजाच्यावतीने रविवारी राजमाता जिजाऊ यांची जयंती सिंदखेडराजा मार्गावरील राजमाता जिजाऊ मॉ साहेब प्रवेशद्वार येथे उत्साहात साजरी कण्यात आली. यावेळी आ. कैलास गोरंट्याल बोलत होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते जिजाऊंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. आ. गोरंट्याल म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांचा गौरवशाली इतिहास कोणीही विसरू शकणार नाही. त्यांनी सामाजिक न्यायाच्या भावनेतून सर्व समाज घटकांना एकत्रित करून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देऊन गौरवशाली विचार घडविला आहे.गोदावरी विकास महामंडळाचे अध्यक्ष भास्करराव अंबेकर म्हणाले, राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखा शूरवीर व रयतेचा राजा घडविल्यामुळे जगाच्या पाठीवर आज त्यांचे नाव कोरले गेले आहे. हा मान आपल्या महाराष्ट्राला मिळाला असून, ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचे सांगितले.कार्यक्रमाचे प्रस्ताविक समस्त ओबीसी समाजाचे निमंत्रक राजेंद्र राख यांनी केले. राख म्हणाले, राष्ट्रीय एकात्मतेची मूळ कल्पना राजमाता जिजाऊ यांचीच होती. म्हणून शिवरायांच्या सैन्यदलामध्ये सर्व जातीधर्माच्या लोकांना मानाचे स्थान मिळाले होते. जिजाऊ यांचे विचार आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत, असेही राख म्हणाले. कार्यक्रमास शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साईनाथ चिन्नादोरे, शहर काँग्रेसचे शहराध्यक्ष शेख महेमूद, गटनेते गणेश राऊत यांच्यासह विविध पक्ष, संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
समाजात समानता आणण्याचे कार्य राजमाता जिजाऊंनी केले : गोरंट्याल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 1:00 AM