- राजू छल्लारेवडीगोद्री (ता.अंबड) : नुकसानीच्या पंचनाम्याचे नाटक कशाला, आता मदत द्या. विमा कंपन्यांना विम्याची २५ टक्के अग्रीम रक्कम द्यायला सांगा. खरीप पिकांची सगळी राखरांगोळी झाली, हे काय विमा कंपनीला समजत नाही का? असा खडा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला. जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी सजवलेल्या बैलगाडीतून शेतकऱ्यांच्या पीक नुकसानाची पाहणी केल्यामुळे त्यांच्यावर त्यांनी यावेळी टीका केली. अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या त्यांनी भेटी घेतल्या. याप्रसंगी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.
पालकमंत्री अतुल सावे यांनी रविवारी जालना जिल्ह्यातील विविध भागात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. अंबड तालुक्यातील दौऱ्यात ते सजवलेल्या बैलगाडीतून बांधावर गेले. त्यामुळे राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना मदत देता येत नाही तर किमान त्यांच्या जखमेवर मीठ तरी चोळू नका, अशा शब्दात टीका केली. जालना जिल्ह्यात मागील दोन महिन्यांत अतिवृष्टीमुळे खरीप पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, त्या नुकसानीचे ना पंचनामे ना मदत मिळाली. आता परत परतीच्या पावसाने धुमाकूळ घालत सोयाबीन, तूर, कपाशी, बाजरी, मक्का, मोसंबी, द्राक्ष व डाळिंब आदी फळपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानीत शेतकऱ्यांना शासनाने आधार देणे गरजेचे असताना पालकमंत्री शेतकऱ्यांच्या जखमेवर फुंकर घालण्याऐवजी मीठ चोळण्यासाठी फिरत आहेत काय?, असा सवाल राजू शेट्टी यांनी अतुल सावे यांना केला आहे.
नुकसानीच्या पंचनाम्याचे नाटक कशाला, आता मदत द्या. विमा कंपन्यांना विम्याची २५ टक्के अग्रीम रक्कम द्यायला सांगा. खरीप पिकांची सगळी राखरांगोळी झाली. हे विमा कंपनीला समजत नाही का? तक्रार करून देखील विमा कंपन्या लक्ष देत नसतील तर सरकार करतं तरी काय? असा प्रश्न राजू शेट्टी यांनी उपस्थित केला. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप, अहमदनगरचे जिल्हाध्यक्ष रवी मोरे, जिल्हाध्यक्ष सुरेश काळे, राजेंद्र खटके, विद्यार्थी आघाडी जिल्हाप्रमुख गणेश गावडे, शिवाजी लहाने, बाबासाहेब दखणे, बप्पासाहेब काळे, अंकुश तारख, रामेश्वर लहाने, विष्णू नाझरकर, गणेश कव्हळे, अजय काळे, लक्ष्मण उघडे, धनराज चिमणे, शुभम सोळंके, मंगेश लहाने, प्रवीण लहाने, योगेश नाझरकर आदींची उपस्थिती होती.