जालना / राजूर : मराठवाडयातील प्रसिद्ध देवस्थान राजूर (ता.भोकरदन जि.जालना) येथील श्री राजुरेश्वर मंदिराला राज्य शासनाकडून पर्यटन स्थळाचा "अ" वर्ग दर्जा मंजूर करण्यात आला आहे. देवस्थानला अ वर्ग दर्जा मिळाल्याने विकास कामाला चालना मिळणार आहे. राजूर भागातच २० एकरवर कृषी पर्यटन केंद्रही उभारले जाणार असल्याची माहिती माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली.
श्री गणपती संस्थानने गेल्या दोन वर्षापूर्वी शासनाकडे प्रस्ताव दाखल करून राजुरेश्वर संस्थानला अ वर्ग दर्जा देण्याची मागणी केली होती. यासाठी रावसाहेब दानवे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. शासनाने एका वर्षात राजुरेश्वराच्या दर्शनासाठी येणारी ७० ते ८० लाख भाविकांची संख्या तसेच परदेशातून येणारे भाविक लक्षात घेवून अ वर्ग दर्जा दिला असून, त्याचा अध्यादेश पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने बुधवारी १९ जून रोजी काढला आहे. राजुरेश्वर मंदिराला ऐतिहासिक व पुरातत्विय पार्श्वभूमी आहे. मंदिराला अ वर्गाचा दर्जा मिळाल्याने स्थानिक भाविक व परदेशातून येणाऱ्या भाविकांसाठी सोयी सुविधा उपलब्ध होणार असल्याने विकास कामाला चालना मिळणार आहे. पर्यायाने आर्थिक उलाढालीत वाढ होवून राजूरच्या वैभवात भर पडणार आहे. दरम्यान, याच परिसरात २० एकरात कृषी पर्यटन केंद्र उभारले जाणार आहे. शेतकरी, विद्यार्थ्यांच्या सहली होणार असून, शेतकऱ्यांना प्रशिक्षणही दिले जाणार आहे. तेथे मुलांसाठी मनोरंजनाचे साहित्य, वाचनालय राहणार असल्याची माहिती रावसाहेब दानवे यांनी दिली.
संस्थानला मिळणाऱ्या निधीत वाढ गेल्या दोन वर्षापूर्वी श्री गणपती संस्थानने शासनाकडे मंदिराला पर्यटनस्थळाचा अ वर्गात समावेश करण्याची मागणी केली होती. यासाठी माजी केंद्रिय रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मेाठे प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नाला यश आल्याने संस्थानला मिळणाऱ्या निधीत वाढ होणार असून, विकास कामाला चालना मिळणार आहे.- गणेश साबळे, व्यवस्थापक, श्री गणपती संस्थान राजूर
राजूरचे नांव आता जगाच्या नकाशावरराजुरेश्वर मंदिराला अ वर्ग दर्जा मिळाल्याने राजूरचे नांव आता जगाच्या नकाशावर आले आहे. ही राजूरकरांसाठी अभिमानाची बाब आहे. शासनाकडून गणपती संस्थानला मेल मिळाला आहे.- प्रशांत दानवे, कार्यालयीन अधीक्षक गणपती संस्थान राजूर