जालना : शिवसेना सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहिली आहे. सत्तेत असतानाही शिवसेना कर्जमाफीसाठी रस्त्यावर उतरली होती. त्यामुळे आता पीकविमा कंपन्या आणि बँकांना वठणीवर आणण्याचे काम शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली करणार आहोत, असे प्रतिपादन पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केले. शनिवारी जालना येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
येथील जालना जिल्हा शिवेसेनेच्या वतीने पीकविमा संदर्भात शेतकऱ्यांकडून तक्रार अर्ज भरून घेतल्या जात आहे. त्यानिमित्त जालना जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये हे केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. जालना येथील तक्रार निवारण केंद्राला रामदास कदम यांनी शनिवारी सकाळी भेट देवून शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, एकीकडे शेतकरी आत्महत्या करित आहे. या रोखल्या गेल्या पाहिजेत, त्यामुळे पीकविमा कंपन्यांनी हातचलाखी न करता पीकविम्याचे वाटप करावे, आगामी काळात बँका आणि पीकविमा कंपन्यांनी शेतकऱ्यांचे हित न जोपासल्यास त्यांना धडा शिकविला जाईल, महाराष्ट्रात २४ हजार कोटी रूपयांची कर्जमाफी देण्यात आली आहे. परंतु, काही बँकांनी कर्ज माफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करित नसल्याचे कदम यांनी सांगितले.
यावेळी प्लास्टीक बंदीबद्दल कदम म्हणाले, प्लास्टीक पासून होणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण ५० टक्के घटले आहे. आगामी काळात आणखी कठोर निर्णय याविषयी घेणार आहोत. दुध पॅकिंगसाठी महाराष्ट्रात दररोज एक कोटी प्लास्टिकच्या पिशव्या लागतात. याबद्दलही लवकरच धोरणात्मक निर्णय घेतला जाईल, असेही कदम यांनी सांगितले. या कार्यक्रमास राज्यमंत्री अर्जून खोतकर, जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरूद्ध खोतकर,शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकर यांच्यासह शेतकऱ्यांची उपस्थिती होती.