भुसावळ : रेमडेसिविर इंजेक्शनची तब्बल २० ते २५ हजारात विक्री करणाऱ्या दोघांना बाजारपेठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. २१ रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास बद्री प्लॉटमधील ओम पॅथालॉजीमध्ये ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी लॅब चालक विशाल शरद झोपे (२८) व कर्मचारी गोपाळ नारायण इंगळे (१८) रा.मानमोडी, ता.बोदवड यांना अटक करीत त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.आरोपींनी आतापर्यंत या माध्यमातून ३० ते ३५ नागरिकांना या इंजेक्शनची विक्री केल्याची माहिती समोर आली आहे. चौकशीअंती आणखीन काही नाव समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.अशी केली कारवाईबद्री प्लॉटमधील ओम पॅथालॉजीमध्ये चढ्या दराने रेमडेसिविर इंजेक्शन मिळत असल्याची तक्रार आल्यानंतर बनावट ग्राहक पाठवून शहानिशा करण्यात आली व अचानक धाड टाकून आरोपींनी रुमालात गुंडाळलेले व एक फुटलेले इंजेक्शन आढळल्याने ते जप्त करण्यात आले. जप्त इंजेक्शनमध्ये १०० एमजीचे हॅड्रा कंपनीचे तीन प्रत्येकी किंमत ५ हजार ४०० व रेमडीक कॅडीला कंपनीचे एक इंजेक्शन किंमत ३ हजार ४०० असे एकूण १९ हजार ६०० रुपयांचे इंजेक्शन जप्त करण्यात आले. पोलिसांना हॅड्रा कंपनीचे एक फुटलेले इंजेक्शन आढळले. मात्र त्याची किंमत लावण्यात आली नाही.ही कारवाई पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, सहायक पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, सहा.निरीक्षक गणेश धुमाळ, ईश्वर भालेराव, सचिन पोळ आदींच्या पथकाने केली. कारवाईदरम्यान दोन पंचांना सोबत घेण्यात आले तर एफडी निरीक्षक अनिल माणिकराव यांनी इंजेक्शनची तपासणी करून ते अधिकृत असल्याचे सांगितले.बाजारपेठ पोलिसात रात्री उशिरा अनिल माणिकराव यांच्या फिर्यादीनुसार संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. पोलीस चौकशीत लॅब मालकाने आतापर्यंत १५ ते २५ हजार रुपये दराने भुसावळात आतापर्यंत ३० ते ३५ हजारात रेमडेसिविरची विक्री केल्याची माहिती दिली आहे. त्यानुषंगाने पोलिसांनी दोन संशयितांना चौकशीकामी ताब्यात घेतले आहे. दरम्यान लॅब संचालिका डॉ. सुकन्या झोपे यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.बाथरूममध्ये सापडले इंजेक्शनलॅब सीलची कारवाई नगर पालिका मुख्याधिकारी संदिप चिद्रवार यांनी केली. यापूर्वी लॅबमध्ये तपासणी केली असता तेथील बाथरूममध्ये एका शर्टच्या खाली इंजेक्शन लपविले असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. या ठिकाणी चार इंजेक्शन होते.
भुसावळात रेमडेसीवीरची काळ्या बाजारात विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 10:01 PM