शिक्षकांचे अनुदान देण्याची मागणी
राजूर : जिल्ह्यातील घोषित, अघोषित व मुल्यांवन प्राप्त तुकड्या व शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना प्रचलित नियमानुसार शंभर टक्के अनुदान देण्यात यावे, अशी मागणी भाजप शिक्षक आघाडीच्या वतीने करण्यात आली. भाजप शिक्षक आघाडीच्या वतीने उपशिक्षणाधिकारी नागेश मापारी यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनावर संजय भातलवंडे, संतोष जोशी, राजेश भिसे, अतुल हेसलकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
उत्कृष्ट अंगणवाडीचा गौरव होणार
जालना : जिल्ह्यातील प्रत्येक अंगणवाडीत परसबाग निर्मिती करून सुदुढ बालक ही संकल्पना रूजवावी . अंगणवाडी सेविकेने नावीण्यपूर्ण उपक्रम अंगणवाडी स्तरावर राबवावेत, उत्कृष्ट अंगणवाडी केंद्राची निवड करून त्या अंगणवाडीचा गौरव केला जाणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांनी सांगितले. १ ते ३० सप्टेंबर या कालावधीत पोषण महिन्याच्या कार्यक्रमाचे उदघाटन जि.प. अध्यक्ष उत्तम वानखेडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सभापती अयोध्या चव्हाण, जयप्रकाश चव्हाण, मुख्य लेखा व वित्त अधिकारी राजेश सोळुंके आदींची उपस्थिती होती.
शिक्षक संघाच्या तालुकाध्यक्षांची निवड
जालना : अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाची बैठक नुकतीच जिल्हाध्यक्ष डॉ. रवींद्र काकडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली असून, यावेळी तालुकास्तरीय कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे. यामध्ये जालना तालुकाध्यक्षपदी गौतम गवई, बदनापूर -अरूण हिवाळे, जाफराबाद नसीम शेख, घनसावंगी संजय खरात, परतूर बाबासाहेब भापकर यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीचे सर्वस्तरातून स्वागत होत आहे.
रस्त्यासह नालींचा अभाव : नागरिक त्रस्त
भोकरदन : तालुक्यातील गोंद्री येथे काही दिवसांपासून सतत पाऊस सुरू असल्याने नाली अभावी अनेक नागरिकांच्या घरासमोर ठिकठिकाणी पाणी साचले असून, तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. स्वच्छता मात्र नावाला राहिली असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे साथीचे रोग पसरत आहे. याकडे ग्रामपंचायत जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे.
लघु तलावाचे जलपूजन
कुंभार पिंपळगाव : घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील लघु तलाव शंभर टक्के भरून ओसंडून वाहत आहे. या तलावाचे जि.प. सदस्य अंशीराम कंटुले यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले आहे. याप्रसंगी संदीप कंटुले, अरूण देवी, रमेश कंटुले, विष्णू शिंदे, दिलीप कंटुले, पांडुरंग कंटुले, जनार्दन बोकण आदींची उपस्थिती होती.