लोकमत न्यूज नेटवर्कजालना : रावणवधाच्या गोष्टी करणा-यांसोबत श्रीकृष्ण असावा लागतो, तो त्यांच्याकडे नाही. आगामी निवडणुकीत धनुष्यबाण हाती घेतात, की हाताचा पंजा वर करतात, हेच अजून निश्चित नाही. म्हणूनच त्यांनी अगोदर चिन्ह निश्चित करावे, त्यानंतर आपल्याविरोधात निवडणूक लढवावी, असे आव्हान भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी रविवारी दिले. पक्षश्रेष्ठींनी आदेश दिले तर दानवेंविरोधात लोकसभा निवडणूक लढण्याचे संकेत राज्यमंत्री खोतकर यांनी दिले होते. याला खा. दानवेंनी रविवारी जोरदार प्रत्युत्तर दिल्याने येत्या काळात दोघांतील राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.शहरातील डॉ. शामाप्रसाद मुखर्जी उद्यानात योगभवनच्या भूमिपूजन कार्यक्रमात राजकीय टोलेबाजी चांगलीच रंगली. काँग्रेसचे माजी आ. कैलास गोरंट्याल, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, माजी आ. अरविंद चव्हाण यांनीही यात रंग भरल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले होते.तुमची सुप्रीम कोर्टाची तारीख होऊ द्या, मग आम्ही तुमची तारीख ठरवू, असे सांगत खा. दानवेंनी नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनाच थेट भाजप प्रवेशाची आॅफर देत येणाºया विधानसभा निवडणुकीत भाजपतर्फे निवडणूक लढविण्याचे साकडे घातल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. यामुळे जालना विधानसभा मतदार संघातून भाजपतर्फे निवडणुकीसाठी बाशिंग बांधून असलेल्यांमध्ये इच्छुकांचा हिरमोड झाला नसेल तरच नवल !जालना शहर तीन टायरच्या रिक्षावर सुरू असून, एक टायर पंक्चर झाल्याने विकासात अडथळे येत आहेत.स्थानिक आमदाराने दहा कोटी रुपये खर्चाच्या कामांचे ठराव घेतले. मात्र, अद्याप छदामही दिला नसल्याचा आरोप माजी आ. गोरंट्याल यांनी केला. तर महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणून जनता आपल्याकडे पाहत आहे, आपण जनतेच्या भावनेचा आदर करत जालना विधानसभेचा विचार करावा, असे माजी आ. अरविंद चव्हाण यांनी आवाहन केल्याने पदाधिकाºयांसह कार्यकर्तेही बुचकळ्यात पडले.
रावणवधाच्या गोष्टी करणाऱ्यांच्या साथीला ‘श्रीकृष्ण’ नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 12:59 AM