विजय मुंडे
जालना : भाजप सरकारच्या काळात मराठा आरक्षण मंजूर झाले होते. उच्च न्यायालयात ते टिकलेही होते. परंतु, सत्तांतरानंतर सर्वोच्च न्यायालयात अपिल झाले आणि तेथे तत्कालीन सरकारच्या दुर्लक्षामुळे आरक्षण रद्द झाले. अंतरवाली सराटी येथे पोलिसांनी केलेला अमानुष लाठीहल्ला हा निषेधार्ह असून, मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी सर्वपक्षीयांनी एकत्रित काम करावे, असे आवाहन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले.
जालना येथे शनिवारी रात्री आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार नारायण कुचे, जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे, विधानसभा अध्यक्ष भास्कर दानवे यांची उपस्थिती होती. मराठा आरक्षणासाठी आजवर झालेल्या शांततामय आंदोलनाची देशानेच नव्हे तर जगाने दखल घेतली आहे. मनोज जरांगे हे चार दिवसांपासून शांततामय मार्गाने आंदोलन करीत होते. परंतु, त्यांची प्रकृती ढासळल्यानंतर त्यांनी उपचार घ्यावेत यासाठी अधिकारी, पोलिस त्या ठिकाणी गेले होते. त्यावेळी झालेल्या शाब्दिक चकमकीनंतर लाठीचार्ज झाला. झालेला लाठीचार्ज हा निषेधार्ह असल्याचे मंत्री दानवे म्हणाले. देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात मराठा आरक्षण मंजूर झाले होते. ते उच्च न्यायालयातही टिकले होते. परंतु, सत्तांतरानंतर तत्कालीन सरकारने कायदेशीर बाबी योग्य पद्धतीने हाताळल्या नाहीत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात आरक्षण टिकले नाही. नंतर शिंदे, फडणवीस सरकारने मराठा समाजासाठी अनेक योजना लागू केल्या आहेत. आरक्षण रद्द होण्यापूर्वी ज्यांनी विविध जागांसाठी अर्ज केले होते त्यांची नोकरभरतीही केली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागावा, यासाठी सर्वपक्षीयांनी राजकारण बाजूला ठेवून काम करावे, असे आवाहनही रावसाहेब दानवे यांनी केले.