विजय मुंडे
जालना : सलग पाच लोकसभा निवडणुकांत जालना मतदारसंघात भाजपचे कमळ फुलविणारे रावसाहेब दानवे यंदा षटकार मारण्याच्या इराद्याने मैदानात उतरले आहेत; तर मविआचे उमेदवार डॉ. कल्याण काळे यांनी मित्रपक्षांचा ‘हात’ हाती घेत जोर लावला आहे. जालन्याची निवडणूक महायुती आणि मविआकडून प्रतिष्ठेची करण्यात आली असून, ‘वंचित’चे उमेदवार प्रभाकर बकले यांच्यासह अपक्ष प्रमुख उमेदवारांची डोकेदुखी वाढविणार आहेत.
जालना लोकसभा मतदारसंघात १९९९ ते २०१९ मध्ये झालेल्या पाचही निवडणुकांत भाजपचे रावसाहेब दानवे यांनी विजय मिळविला आहे. यामुळे महायुतीचे अर्थात भाजपचे वर्चस्व असलेल्या या मतदारसंघात दानवे यांचा षटकार मारण्याचा इरादा आहे. यंदाच्या निवडणुकीत मनोज जरांगे यांचे मराठा आरक्षण आंदोलन, शेतमालाचे भाव, बेरोजगारी असे मुद्दे आहेत. ‘मविआ’च्या उमेदवारांनी याच मुद्द्याला प्रचारात हात घातला आहे. असे असले तरी दानवे यांच्याकडून केंद्र, राज्य शासनाच्या वतीने करण्यात आलेल्या विकास कामांवर भर देत प्रचार केला जात आहे.