जालना - केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवेंचा साधेपणा नेहमीच चर्चेचा विषय असतो. त्यांची बोलीभाषा, त्यांचा गावरान साधेपणा, ग्रामीण बाज आणि शब्दांमध्ये जाणवणारा गावाकडचा संवाद ही त्यांची विशेषत: आहे. त्यामुळेच, गावकडच्या लोकांना ते कायम आपलेसे वाटतात. केंद्रीयमंत्री असले तरी त्यांच्यातील ती ग्रामीण शैली हीच त्यांची ओळख आहे. त्यामुळेच, कधी पत्नीसोबत पिठलं भाकर खाताना, कधी बैलगाडी हाकताना त्यांचा फोटो व्हायरल झाला आहे. सध्या, रावसाहेब दानवे पक्षातील तरुण कार्यकर्त्यांसोबत डब्बा पार्टी करत संवाद साधत आहेत.
रावसाहेब दानवेंच्या याच डब्बा पार्टीची सध्या गावखेड्यात, सोशल मीडियात चर्चा चांगलीच रंगली आहे. रावसाहेब दानवे हे गेल्या काही दिवसांपासून पक्षातील तरुण कार्यकर्त्यांसोबत डब्बा पार्टीच आयोजन करत संवाद साधत आहेत. तसेच आगामी नगरपालिका आणि महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षातील कार्यकर्त्यांना चार्ज करत, कामाला लागा असा सदेशच देत आहेत. त्यांच्या याच डब्बा पार्टीची जोरदार चर्चा सुरू आहे. रविवारी दानवेंनी बदनापूर येथे डब्बा पार्टीचं आयोजन केलं होतं.
बेसन भाकर सर्वात आवडतं
बेसन भाकर हे माझ्या सर्वात आवडतं जेवण, मी 12 वर्षे हातानं स्वयंपाक केलाय. कमी वेळेते तयार होणारं हे जेवणं, त्यामुळेच कोण्या गावात गेल्यावर कार्यकर्त्यानं जेवणाचा आग्रह केल्यावर आम्ही म्हणतो, बेसन भाकर असेल तर जेऊन जातो, असे दानवे यांनी म्हटलं. म्हणून आजच्या डब्बा पार्टीलाही मी घरुन बांधून आणलंय बेसन भाकर, असेही दानवेंनी म्हटलं
काय म्हणाले दानवे
'कोणी भरीत दिलं, कोणी काकडी दिली, कोणी कांदा दिला, चटणी दिली, बेसन दिलं. एकजणाने तर लाडूपण दिलाय. घरचे वेगवेगळे पदार्थ एकत्र आणून खाणं, याच्याइतका आनंद कुठं फाईव्हस्टारच्या हॉटेलमध्येही नाही. या डब्बा पार्टीतून कार्यकर्त्यांसोबत प्रेम वाढते, स्नेह वाढतो. एक वेगळं केल्यासारखं वाढतं, गावात चर्चा होती. कारण, ही पार्टी केवळ खाण्यासाठी नसते. संघटनात्मक काम करण्यासाठी ही पार्टी असते, सगळे आपल्या- आपल्या भाकरी घेऊन जाते, असेही दानवेंनी म्हटलं.
यापूर्वी मुंबईत वडापाववर मारला ताव
केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव मुंबई दौऱ्यावर आले होते. त्यावेळी, रावसाहेब दानवेंनी त्यांचे स्वागत केले. या दोन्ही केंद्रीय मंत्र्यांनी लोकल रेल्वेचा प्रवास आणि स्थानकाची पाहणी केली. या पाहणीनंतर रावसाहेब दानवेंचे नेहमीप्रमाणे एक वेगळे रुप पाहायला मिळाले होते. कारण, त्यांनी आश्विनी वैष्णव यांच्यासोबत रेल्वे स्थानकाबाहेर वडापाव आणि भज्याचा आनंद घेतला. नाश्ता करताना हे सगळे अगदी तुटून पडलेले पाहायला मिळाले. ठाणे स्थानकाच्या बाहेर असलेल्या गजानन या प्रसिद्ध वडा पाव विक्रेत्याच्या हॉटेलमध्ये या सगळ्यांनी वडापाववर ताव मारला होता.