Jalna Constituency : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये अनेक ठिकाणी बंडखोरी पाहायला मिळत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यामुळे अनेक इच्छुक बंडखोरीच्या पवित्र्यात आहेत. विशेष म्हणजे, भाजपमध्येही अनेक ठिकाणी बंडखोरी पाहायला मिळत आहे. जालना विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाचे उमेदवार अर्जुन खोतकर यांच्याविरोधात भाजप बंडखोरी करण्याच्या तयारीत आहे.
लोकसभा निवडणुकीत जालना मतदारसंघात भाजपला मोठा धक्का बसला होता. पक्षाचे दिग्गज नेते रावसाहेब दानवे यांचा काँग्रेसच्या कल्याण काळेंकडून पराभव झाला. स्थानिक शिवसेना नेत्यांनी भाजपचे काम न केल्यामुळे सलग पाचवेळा निवडून येणाऱ्या दानवेंचा पराभव झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळेच आता विधानसभा निवडणुकीत भाजपकडून शिंदे सेनेच्या अर्जन खोतकरांविरोधात बंडखोरी केली जात आहे.
रावसाहेब दानवेंचा भाऊ बंडखोरीच्या तयारीतमाजी मंत्री अर्जुन खोतकर यांना शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी घोषित झाली. त्यानंतर आता रावसाहेब दानवे यांचे चुलत भाऊ भास्कर दानवे बंडखोरी करण्याची शक्यता आहे. जालना विधानसभा मतदार संघात आपण रावसाहेब दानवेंच्या माध्यमातून दहा वर्षांपासून भाजपा पक्ष वाढीचे आणि विकासाची कामे केल्याचा दावा भास्कर दानवे यांनी केला आहे. आपण भाजपा कार्यकर्त्यांशी चर्चा करून दोन दिवसात निर्णय घेणार असल्याचे सांगितले.
विशेष म्हणजे, भास्कर दानवे यांच्यासह भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य राजेश राऊत हेदेखील जालना विधानसभा लढवणार असल्याची माहिती आहे. राजेश राऊत हे भाजपचे माजी नगराध्यक्ष असून, जालना शहरासह विधानसभा मतदार संघात त्यांची चांगली पकड आहे. म्हणजेच, आता अर्जुन खोतकर यांच्याविरोधात भाजपचे दोघे बंडखोरी करण्याची तयारीत आहेत. त्यामुळेच अर्जुन खोतकर यांना यंदाची निवडणूक जड जाण्याची शक्यता आहे. आता भाजप आपल्या बंडखोरांची समजून काढणार का? हे पाहणे महत्वाचे आहे.