गोंदी (जालना ) : जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून अंबड तालुक्यातील बारसवाडा येथील गल्हाटी प्रकल्पात तातडीने पाणी सोडण्यात यावे, यासाठी शनिवारी दुपारी दीड तास जालना वडीगोद्री राज्य महामार्गावरील शहापूर येथे गल्हाटी संघर्ष समिती व शेतकरी संघटनेतर्फे रास्तारोको करण्यात आला.
यंदा बारसवाडा परिसरात अल्प प्रमाणात पाऊस पडला आहे. यामुळे हा प्रकल्प मार्च महिन्यातच कोरडाठाक पडला असून येथे पाण्याचा प्रश्न बिकट बनला आहे. या प्रकल्पातील पाण्यामुळे पंचक्रोशीतील ५० ते ६० हजार नागरिकांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागू शकतो. तसेच या परिसरात मोठ्या प्रमणात फळबागा आहेत. परंतु, पाण्याअभावी त्या संकटात सापडल्या आहेत. विहिरी व बोअरने तळ गाठला आहे. यामुळे या प्रकल्पात पाणी सोडल्यास याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल, असे आंदोलनकर्त्यांनी सांगितले आहे.
या पूर्वीही संघर्ष समितीने जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना, जायकवाडी अधीक्षक अभियंता व प्रशासक लाभक्षेत्र विकास प्राधिकरण विभाग औरंगाबाद यांना वेळोवेळी निवेदने दिली आहेत. परंतु, याचा कोणाताही फायदा झाला नसल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले आहे.
दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू सुरू असल्याने मंडळ अधिकारी दिवाकर जोग्लादेवीकर यांना निवेदन देवून आंदोलन मागे घेण्यात आले. तातडीने पाणी प्रकल्पात सोडले नाही तर यापुढेही आंदोलन तीव्र करण्यात येईल, असेही निवेदनात म्हटले आहे. यावेळी संघर्ष समितीचे अध्यक्ष बंडू माईंद, शेतकरी संघटनेचे नेते सुरेश काळे, पं. स. सदस्य राईज बागवान, शहापूरचे सरपंच व ग्रामस्थांची उपस्थिती होती.