वाटूर ( जालना ) : ओबीसी समाजाला (OBC Reservation) राजकीय आरक्षण मिळावे, या मागणीसाठी ओबीसी समाजाच्या वतीने वाटूर येथे मंगळवारी जालना ते नांदेड महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक तब्बल दोन तास ठप्प होती.
ओबीसी घटकासाठी घटनेने दिलेले राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहे. ओबीसी समाजाला आरक्षण नसतानाही राज्यात निवडणुका घेतल्या जात आहे. यामुळे ओबीसी समाजावर अन्याय होत आहे. राज्य शासनाने जोपर्यंत ओबीसी समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत कोणत्याही निवडणूक घेऊ नये. शिवाय, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आवश्यक तो डाटा सादर करावा, या मागणीसाठी वाटूर येथे जालना -नांदेड महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
आंदोलनामुळे जालना - नांदेड महामार्गावरील वाहतूक तब्बल दोन तास ठप्प होती. यामुळे वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागला. यावेळी जागर गोंधळ करून मागण्या मांडण्यात आल्या. यावेळी आंदोलकांसाठी चहा-पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.