लोकमत न्यूज नेटवर्कजालना : दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर यांच्या वतीने दरवर्षी कवि धम्मपाल रत्नाकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘रत्नाकर राज्य काव्य पुरस्कार’ उत्कृष्ट काव्यसंग्रहाला दिला जातो. डॉ. रफिक सूरज यांच्या निवड समितीने २०१८ मध्ये प्रकाशित झालेल्या कविता संग्रहापैकी डॉ. संजीवनी तडेगावकर यांच्या ‘संदर्भासहित’ काव्यसंग्रहाची या पुरस्कारासाठी निवड केली. त्यानंतर सभेचे कार्यवाह प्रा. डॉ. विनोद कांबळे यांनी यंदाचा हा पुरस्कार जाहीर केला.रोख रक्कम पाच हजार रूपये, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असून, रविवारी (दि.१२) सकाळी ११ वाजता कोल्हापूर येथील शाहू स्मारक भवन सभागृहात लोकसाहित्याच्या ज्येष्ठ अभ्यासक तारा भवाळकर यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. ‘रत्नाकर राज्य काव्य पुरस्कार’ डॉ. तडेगावकर यांना मिळाल्याबद्दल साहित्य क्षेत्रातून त्यांचे स्वागत होत आहे.डॉ. तडेगावकर यांची फुटवे, अरूंद दारातून बाहेर पडताना, संदर्भासहित (कवितासंग्रह), पापुद्रे (मुलाखतसंग्रह), चिगूर (ललित लेखसंग्रह) आणि झरे मोकळे झाले (समीक्षा) इ. पुस्तके प्रकाशित असून, त्यांच्या साहित्यास महाराष्ट्र शासनाचा इंदिरा संत पुरस्कार, मसाप पुणेचा कुसुमाग्रज पुरस्कार, यशवंतराव चव्हाण राज्य पुरस्कारासह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या २० संस्थांनी सन्मानित केले आहे.
संजीवनी तडेगावकर यांना ‘रत्नाकर’ राज्य काव्य पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 12:28 AM