लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : औरंगाबाद - जालना स्थानिक स्वराज्य मतदारसंघाची निवडणूक २० दिवसांवर येऊन ठेपली आहे. असे असतांना भाजप-शिवसेना युतीकडून औरंगाबादचे शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. परंतु अद्याप काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोणाला उमेदवारी मिळते याकडे लक्ष लागून आहे.औरंगाबाद - जालना स्थानिक स्वराज्य मतदारसंघात गेल्या काही वर्षामध्ये उमेदवार हा औरंगाबाद जिल्ह्यातून लादलेला आहे. त्यामुळे यंदा जालना जिल्ह्यातून काँग्रेसने उमेदवार द्यावा अशी मागणी काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीकडून होत आहे. गेल्या निवडणुकीत अंबडचे माजी नगराध्यक्ष बाबूराव कुलकर्णी यांना उमेदवारी जाहीर झाली होती. परंतु ऐनवेळी त्यांचा पत्ता कापला गेला.या मतदारसंघात ६१६ मतदार आहेत. भाजपा -सेनेचे ३०० च्या जवळपास मतदार असून, कॉग्रेस व राष्ट्रवादीची २५१ च्या जवळपास मतदार आहेत तर एमआयएमची संख्या ही २७ असून, अन्य ४१ मतदार आहेत. दरम्यान कॉग्रेसचे सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी गेल्या काही महिन्यांपासून युतीशी सलगी केल्यामुळे त्यांची मते काँग्रेसकडे जाणार की, युतीकडे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.विद्यमान आमदार सुभाष झांबड निवडणूक लढणार नसल्याचे बोलले जात असले तरी अद्याप त्यांनी त्याचे पत्ते खुले केले नाहीत. काँग्रेसकडून अंबडचे बाबुराव कुळकर्णी, कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख तसेच कन्नडचे संतोष कोल्हे यांच्या नावाची चर्चा आहे.भोकरदन तालुक्यात नगरपरिषद व जिल्हापरिषद मिळून ३० मतदार आहेत. त्यापैकी नगरपरिषदेत काँग्रेसकडे ११ तर राष्ट्रवादीकडे ४ व भाजपाकडे ४ मतदार आहेत तर जिल्हा परिषदेत भाजपकडे ८ व शिवसेनेकडे २ तर राष्ट्रवादीकडे १ मतदार आहे.राजकीय वर्तुळात चर्चासिल्लोडचे आ. सत्तार यांनी रविवारी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेतली. या भेटीच्या वेळी हे दोनच नेते उपस्थित होते. या दोन नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, याचा तपशील दोघांनीही उघड केला नाही. विशेष म्हणजे आ. सत्तार यांचे पुत्र सिल्लोडचे नगराध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांना या मतदारसंघातून उमेदवारीबाबत चर्चा झाली असावी असा अंदाज राजकीय वर्तुळात वर्तवला जात आहे. दरम्यान शनिवारी युतीचे संभाव्य उमेदवार अंबादास दानवे यांनी केंद्रीय मंत्री दानवेंची जालन्यात भेट घेतली. यावेळी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
रावसाहेब दानवे-सत्तारांमध्ये पुन्हा गुप्तगू; अंबादास दानवेंनी घेतली जालन्यात भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 12:43 AM