आज मांडल्या गेलेल्या अर्थसंकल्पात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेमध्ये जे प्रत्येक शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जात होते त्यामध्ये ७५ हजार कोटी रुपयांवरून ६५ हजार कोटी रुपये इतकी कपात करण्यात आली आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना प्राप्त होणाऱ्या तुटपुंज्या लाभापासून वंचित ठेवण्यासारखे आहे. याबरोबरच एम.एस.पी. दीडपट दिली जाणार अशी घोषणा केली गेली; परंतु वस्तुस्थिती एम.एस.पी.साठीची तरतूद दीडपट केली जाणार आहे. हा शब्दांचा खेळ आहे. विमा क्षेत्रात ७४ टक्क्यांपर्यंत विदेशी गुंतवणूक केली जाऊ शकेल, आजपर्यंत ही मर्यादा ४९ टक्के इतकी होती. यामुळे विमा क्षेत्र विदेशी खाजगी भांडवलदारांच्या हाती जाईल.
सरकारच्या माध्यमातून रेल्वे, एअरपोर्ट, रस्ते, वीज, शेती, वेअर हाऊसेस, बंदरे, यासह तेवीस सार्वजनिक उपक्रमांची विक्री केली जात आहे. हे देशातील सुजाण नागरिकांनी समजून घेतलं पाहिजे. एकूणच हा अर्थसंकल्प भ्रमनिरास करणारा आहे.
-डॉ मारोती तेगमपुरे,
अर्थशास्त्र विभागप्रमुख,
गोदावरी महाविद्यालय, अंबड, जि. जालना
...................
ज्येष्ठ नागरिकांना दिलासा
जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात ज्येष्ठ नागरिक व निवृत्तीधारकांना आयकर विवरणपत्र दाखल करण्याची गरज नाही. आयकर तपासणी फक्त तीन वर्षांपर्यंत मागे जाऊन करता येणार आहे. छोट्या करदात्यांसाठी नवीन फेसलेस योजना आणली आहे. सरकारचा खर्च हा उत्पन्नापेक्षा ९.५ टक्के जास्त झाल्याने सरकार ती भरपाई संपत्ती विकून पूर्ण करणार आहे. एकूणच जीएसटी कायद्यातही अनेक सकारात्मक बदल केले आहेत.
-डॉ. चंद्रशेखर चोबे
कर सल्लागार
....................
पायाभूत सुविधांवर भर
अर्थसंकल्पात पायाभूत सुविधा वाढीसाठी मोठी तरतूद केली आहे. त्यामुळे आशेचा नवीन किरण समोर आला आहे. शिक्षण, आरोग्य, वाहतूक यावरही भरीव तरतूद केली आहे. त्यामुळे कर सवलत वगळता हा अर्थसंकल्प सर्वार्थाने चांगला म्हणावा लागेल.
-निखिल बाहेती, सी.ए.
...................
पारदर्शकतेला महत्त्व
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात डिजिटल व्यवहारांना महत्त्व देऊन पारदर्शकता आणण्याचा केलेला प्रयत्न स्तुत्य म्हणावा लागेल, चैनीच्या वस्तूंच्या किमती वाढविल्याने त्यातून कर मिळण्यास अधिक वाव आहे, सैनिकी शाळा, एकलव्य योजना आणि जनगणना हे देखील चांगले उपक्रम म्हणावे लागतील.
-प्रा. सुखदेव मांटे
...............