लोकमत न्यूज नेटवर्कजालना : राज्याच्या पशुसंवर्धन विभागाने कमी निधीतही चांगली प्रगती केली आहे. गोकुळ मिशनचे सात पुरस्कार विभागाला कामगिरीबद्दल मिळाले आहेत. पशुपालक आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी पशुसंवर्धन विभाग खंबीरपणे उभा असून, येणा-या टंचाईच्या काळातही मुक्या जनावरांची तहान भूक भागविण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात आल्या आहेत. राज्यात चारा साक्षरता अभियानही राबविण्यात आले आहे, तसेच वैरण आणि खते वितरणाकरिता १० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे, अशी माहिती राज्याचे पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी दिली.जालन्यात आयोजित तीन दिवसीय महा पशुधन एक्स्पोला शनिवारी सुरूवात झाली. यावेळी जानकर यांनी उपस्थितांशी संवाद साधला. जानकर म्हणाले, ग्रामीण महाराष्ट्रात उपेक्षितांच्या दारापर्यंत विकासाची फळे पोहोचविण्यात राज्याच्या पशुसंवर्धन विभाग आघाडीवर आहे. अलिकडे पशुजन्य उत्पादनांना वाढलेली मागणी आणि त्या तुलनेत असलेला अपुरा पुरवठा यामुळे पशुसंवर्धनाशी संबंधित सर्व व्यवसाय ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा ठरत आहे. शेतीच्या उत्पन्नातील अनिश्चिततेमुळे पिचलेल्या शेतक-यांच्या हाती चार पैसे मिळवून देण्यात हा विभाग यशस्वी ठरला असल्याचे जानकर यांनी यावेळी नमूद केले. राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत शासनाने १०० टक्के अनुदानावर वैरण खते वितरणासाठी १० कोटींचा निधी दिला आहे. तसेच अधिक चारा उत्पादनासाठी खते खरेदीसाठी अनुदान दिले जाणार आहे. अनुदानाची ही रक्कम थेट शेतक-यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.तत्पूर्वी दीपप्रज्वलन तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अधार्कृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
टंचाईकाळातही जनावरांची तहान-भूक भागविण्यास सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2019 1:05 AM