- फकिरा देशमुखभोकरदन :भोकरदन विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत रेकॉर्डब्रेक ३२ उमेदवार उभा असून, त्यातही अपक्षांची संख्या १९ इतकी आहे. निवडणूक रिंगणात ३२ उमेदवार असले तरी येथील खरी लढत ही महायुतीविरुद्ध मविआचे उमेदवार दानवे विरुद्ध दानवे अशीच राहणार असल्याचे चित्र आहे.
भोकरदन विधानसभा मतदारसंघात १९५२ पासून ते २०२४ पर्यंत जेवढ्या निवडणुका झाल्या त्यामध्ये यंदाच्या निवडणुकीत सर्वाधिक उमेदवार उभा आहेत. या मतदारसंघात १९८० मध्ये ३ उमेदवार व १९८५ च्या निवडणुकीत ३ उमेदवार होते. १९९० ला १० उमेदवार निवडणूक रिंगणात होते. १९९५ ला ११, तर १९९९ ला ४ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. २००४ मध्ये ८, तर २००९ च्या निवडणुकीत १० उमेदवार रिंगणात होते. २०१४ च्या निवडणुकीत २० उमेदवार रिंगणात होते, तर गतवेळी २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत सहा उमेदवार निवडणुकीत रिंगणात होते. मात्र, आता होत असलेल्या २०२४ च्या निवडणुकीत तब्बल ३२ उमेदवारांनी आपली उमेदवारी कायम ठेवल्यामुळे निवडणूक विभागाला मतदान करण्यासाठी तीन मशीन लावाव्या लागणार आहेत.
लढत दानवे विरुद्ध दानवेंमध्येचमाजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा बालेकिल्ला म्हणून परिचित असलेल्या भोकरदन विधानसभा मतदारसंघातील लढतीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. महायुतीकडून भाजपचे नेते तथा रावसाहेब दानवे यांचे सुपुत्र संतोष दानवे यांना तिसऱ्यांदा निवडणूक आखाड्यात उतरविण्यात आले आहे, तर मविआकडून मित्रपक्ष राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून तीन वेळा आमदार राहिलेले चंद्रकांत दानवे यांना मैदानात उतरविण्यात आले आहे.
अपक्ष किती मते घेणारयंदाच्या निवडणुकीत राष्ट्रीय पक्षाचे तीन, राज्य मान्यता असलेल्या पक्षांचे १० आणि अपक्ष १९ असे एकूण ३२ उमेदवार आहेत. त्यातही अपक्षांची संख्या १९ असून, हे अपक्ष आणि राज्य मान्यता पक्षाचे उमेदवार किती मते घेणार यावर विजयाची गणिते अवलंबून राहणार आहेत.