जालना : यंदा जून महिन्यात पडलेल्या दमदार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांनी प्रथमच जूनमध्ये कपाशीसह अन्य पिकांची पेरणी केली होती. त्याचे चांगले परिणाम आता दिसून येत आहेत. परतीच्या पावसाचा फटका बसला नसता तर, आजच्यापेक्षा कापसाचे अधिक उत्पादन झाले असते. गेल्यावर्षीचा विचार केल्यास आजच्या तारखेपर्यंत कापूस उत्पादक जिल्ह्यात केवळ १८ लाख क्विंटल कापसाची खरेदी केली होती. ती यंदा तब्बल ६० लाख क्विंटलवर पोहोचली आहे. कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर असल्याने यंदा ३० सप्टेंबरपर्यंत कापूस खरेदी सुरू राहणार आहे.
कापूस उत्पादनात आघाडीवर असलेले विदर्भातील दहा आणि मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत कापसाची खरेदी मोठ्या प्रमाणावर झाली आहे. एकट्या जालना जिल्ह्याचा विचार केल्यास गेल्या हंगामात चार लाख २१ हजार क्विंटल एवढीच खरेदी झाली होती. तीच खरेदी यंदा सहा लाख क्विंटलवर पोहोचली आहे.
यंदा सीसीआयने कापूस खरेदीसाठी ८८ खरेदी केंद्र सुरू केले होते. आजघडीला त्यांच्याकडे कापूस साठविण्यासाठी पुरेशी जागा शिल्लक नसल्याने जास्तीत जास्त जिनिंगचालकांशी संपर्क करून त्यांच्याकडे सूत काढण्यासाठी तसेच कपाशीच्या गाठी तयार करण्यासाठी दिला जात आहे. संपूर्ण राज्याचा विचार केला असता, शंभरपेक्षा अधिक खाजगी जिनिंग आहेत. त्यात काही ठिकाणी कापसापासून धागा निर्मितीदेखील केली जाते. सध्या सीसीआयकडून कापसाला हमीभाव म्हणून पाच हजार ७०० रुपयांचा दर प्रतिक्विंटलला मिळत असल्याने आजपर्यंत सरासरी या दराने ६० लाख कापूस खरेदीची किंमत ही तीन हजार कोटी रुपयांच्या घरात जात असल्याचे सांगण्यात आले.
चौकट
सुती धाग्याला मिळाला ऐतिहासिक भाव
कापसापासून धागानिर्मिती उद्योगाला यंदा कोरोनानंतर चांगले दिवस आले ओहत. कधी नव्हे, तो सुती धगाा ३०० रुपये प्रतिकिलो या दराने विक्री होत असल्याचे सांगण्यात आले. यंदा जिनिंग उद्योगाने कात टाकली असून, सीसीआयकडून सूतनिर्मिती आणि गठाण तयार करण्यासाठी कच्चा माल मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असल्याने हा उद्योग यंदा तेजीत आहे.
संजय राठी, संचालक काॅटन असोसिएशन ऑफ इंडिया आणि टेक्सप्रोसिल