विजय मुंडे
जालना : जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या मिशन कवच कुंडलअंतर्गत बुधवारी दिवसभरात पुन्हा रेकॉर्डब्रेक २८ हजार ४७६ जणांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली. या उपक्रमांतर्गत गत पाच दिवसात तब्बल एक लाख ८७ हजार ४७७ जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.
जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या समाधानकारकरित्या घटली आहे. परंतु, कोरोना लसीकरणाची गती अपेक्षितरित्या वाढत नव्हती. ही बाब पाहता पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. विवेक खतगावकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले यांच्या संकल्पनेतून १५ ते २५ सप्टेंबर या कालावधीत मिशन कवच कुंडल मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेंतर्गत आजवर एक लाख ८७ हजार ४७७ जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. यात बुधवारी तब्बल २८ हजार ४७६ जणांचे लसीकरण झाले. पहिल्या टप्प्यात मिशन कवच कुंडल मोहीम २५ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात राबविली जाणार आहे. त्या अनुषंगाने लसीकरणाबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली असून, लसीकरणाचा टक्का समाधानकारकरित्या वाढत आहे.
चौकट
असे झाले लसीकरण
दिनांक एकूण लसीकरण
१५ सप्टेंबर २६,१६१
१६ सप्टेंबर २४,३२६
१७ सप्टेंबर २१,९४६
१८ सप्टेंबर २७,३२९
१९ सप्टेंबर ०००६०
२० सप्टेंबर २२,७७८
२१ सप्टेंबर २७,४०१
२२ सप्टेंबर २८,४७६
जिल्ह्यात २०० वर केंद्रे
मिशन कवच कुंडल मोहिमेंतर्गत अधिकाधिक नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी जिल्ह्यात दैनंदिन सरासरी २००पेक्षा अधिक लसीकरण केंद्रे सुरू केली जात आहेत. महिला बाल विकास विभाग, शिक्षण विभाग, पंचायत समिती विभाग, महसूल विभागासह विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी, विविध संस्था, संघटना, लोकप्रतिनिधींनी या मोहिमेत सहभाग नोंदवून जनजागृती केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील लसीकरणाचा टक्का वाढला आहे.
कोट
जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांचे वेळेवर लसीकरण करून घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दैनंदिन विविध गावांमध्ये लसीकरण शिबिरे आयोजित केली जात आहेत. ज्यांनी लस घेतली नाही, अशा लाभार्थ्यांनी वेळेत लसीकरण करून घ्यावे. लसीकरणानंतरही प्रशासकीय सूचनांचे पालन करावे.
डॉ. विवेक खतगावकर, जिल्हा आरोग्य अधिकारी