जालना : लोकसभा मतदार संघातील भाजपा, शिवसेना युतीचे अधिकृत उमेदवार रावसाहेब पाटील दानवे यांनी नामनिर्देशन पत्रासोबत दाखल केलेल्या शपथपत्रात शैक्षणिक पात्रतेबाबत चुकीची माहिती दिली असल्याचा आक्षेप वंचीत बहुजन आघाडीचे उमेदवार शरदचंद्र वानखेडे यांनी निवडणूक अधिकारी यांच्याकडे लेखीस्वरुपात दाखल केला आहे.
2014 या वर्षी झालेल्या निवडणुकीच्या वेळी उमेदवारी अर्ज दाखल करताना दानवे यांनी 2011 यावर्षी पदवीपर्यंत शिक्षण घेतल्याचे शपथपत्रात नमूद केले होते. तर यावेळी अर्ज दाखल करताना मात्र शैक्षणिक पदवी 2012 यावर्षी घेतल्याचे शपथपत्रात नमूद केले आहे. दानवे यांनी नेमकी कोणत्या वर्षी पदवी प्राप्त केली असा आक्षेप वानखेडे यांनी घेतला आहे.
आक्षेप फेटाळला
मात्र शपथपत्रात नमूद माहिती बाबत हस्तक्षेप करण्याचा अधिकार आमचा नाही असे सांगून जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रविंद्र बिनवडे यांनी वानखेडे यांचा आक्षेप फेटाळून लावला अशी प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणी आपण कोर्टात जाणार असल्याचे वानखेडे यांनी लोकमतशी बोलतांना सांगितले.