जय बजरंग सेवाभावी संस्थेकडे शासनाने हमीभाव मका खरेदी करण्याला परवानगी दिली आहे. या ठिकाणी मक्यातील आद्रता पाहुन खरेदी केली जाते. या ठिकाणी जाफराबाद तालुक्यातील विविध गावांतील शेतकऱ्यांनी मका विक्रीसाठी नोंदणी केली आहे. अद्यापही काहींची खरेदी होणे बाकी आहे. तर शेतकरी अरूण सिरसाठ या शेतकऱ्याने नोंदणी करून संदेश प्राप्त झालेल्या वेळेनुसार माहाेरा येथील खरेदी केंद्रावर मका दाखल केली. मात्र, मकातील आद्रता ही जास्त असल्याचे कारण देत मका घेण्यास नकार दिला. मात्र व्यापाऱ्यांनी मागच्या दाराने दाखल केलेल्या १८ ते १९ आद्रता असलेल्या मकाची खरेदी या ठिकाणी करण्यात आली. ३१ जानेवारी रोजी रात्री हा प्रकार घडल्याचे शिरसाठ यांचे म्हणणे आहे. जवळपास ३० टनापेक्षा अधिक मका यावेळी खरेदी करण्यात आली. असे प्रकार मागील आठ दिवसांपासून सुरू होते. अनेक शेतकऱ्यांबरोबर शासकीय खरेदी केंद्राकडून असे प्रकार झाले असून या सर्वच प्रकाराची चौकशी करावी अशी मागणी माहोरा येथील शेतकरी अरूण भिवसन शिरसाठ यांनी केली आहे. या गैरप्रकाराची चौकशी न झाल्यास जाफराबाद तहसिल कार्यालयासमोर अन्य शेतकऱ्यांसह उपोषणाला बसणार असल्याचा इशाराही त्यांनी तहसिलदारांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
....
गैरप्रकार आढळल्यास कारवाई करू
संबंधीत खरेदीदारांकडून मका खरेदी बाबत काही चुकीचा प्रकार घडला असेल तर त्याची माहिती घेऊन ती वरीष्ठांना कळविण्यात येईल. गैरप्रकार आढळून आल्यास कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा मार्केटींग अधिकारी विमल वाघमारे यांनी सांगीतले.
..................