जालना/बदनापूर : वराह का नेले असे विचारणाऱ्या तरुणाचा नातेवाइकांनीच चाकूने वार करून खून केल्याची घटना बदनापूर शहरातील रेल्वेस्टेशन रोडवर गुरुवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. रमेश भीमराव धोत्रे (२१, रा. साईनगर पाण्याच्या टाकीजवळ, बदनापूर) असे मयताचे नाव आहे. या प्रकरणी भीमराव धोत्रे यांच्या फिर्यादीवरून संशयित राजू संभाजी डुकरे, राहुल राजू डुकरे, लखन राजू डुकरे (रा. सावरकरनगर, ता. बदनापूर, जि. जालना) यांच्याविरुद्ध बदनापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बहिणीचा मुलगा राहुल डुकरे, बहिणीचा जावई रमेश पिटकर यांनी चार ते पाच दिवसांपूर्वी भीमराव धोत्रे यांचे पाच ते सहा वराह नेले होते. धोत्रे यांनी त्यांच्या बहिणीला सांगितले होते. याबाबत गुरुवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास बदनापूर येथील रेल्वेस्टेशन रोडवरील फिर्यादीच्या भावाच्या घरासमोर बैठक बोलावली होती. या बैठकीत सर्व नातेवाईक हजर होते. यावेळी फिर्यादी भीमराव धोत्रे यांनी राहुल डुकरे आणि रमेश पिटकर यांना तुम्ही माझे वराह का घेऊन गेले, असे विचारले. त्यावर दोघेही म्हणाले की, आम्ही तुमचे वराह नेले नाही.
तेवढ्यात फिर्यादीचा मुलगा रमेश धोत्रे हा म्हणाला की, तुम्हीच वराह घेऊन गेले. त्यानंतर राजू डुकरे याने रमेशचा उजवा हात पकडून मुरगळला. राहुल डुकरे याने त्याच्याजवळील चाकूने पाठीवर वार केले. लखन डुकरेने काठीने मारहाण केली. त्यात रमेश जखमी झाला होता. त्याला तात्काळ बदनापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. दरम्यान, घटनास्थळावरून आरोपी फरार झाले असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
घटनास्थळाला डीवायएसपींची भेटघटनेची माहिती मिळताच, बदनापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा केला. घटनास्थळाला डीवायएसपी मुकुंद आघाव यांनी भेट दिली आहे. दरम्यान, फरार झालेल्या आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.