जालना : वेदनेने विव्हळणारे अनेक रूग्ण जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी येतात. मात्र, रूग्णवाहिकेतून येणाऱ्या रूग्णांना स्ट्रेचरद्वारे डॉक्टरांकडे नेण्याची जबाबदारी काही वेळा कर्मचारी पार पाडत नाहीत. त्यामुळे नातेवाईकांनाच स्ट्रेचर ओढावे लागते. असे चित्र बुधवारी दुपारी जिल्हा रूग्णालयात दिसून आले.
अपघात, मारहाणीतील जखमींसह विविध आजारांनी ग्रासलेले शेकडो रूग्ण जिल्हा रूग्णालयात दैनंदिन उपचारासाठी येतात. जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रूग्णांना अतिदक्षता विभागात नेण्यात येते. मात्र, रूग्णालयाच्या प्रवेशद्वारावर १०८ रूग्णवाहिकेतून रूग्ण आला तरी कर्मचारी स्ट्रेचर घेऊन जात नसल्याचे चित्र आहे. बुधवारी दुपारी १.४१ वाजण्याच्या सुमारास असाच प्रकार जिल्हा रूग्णालयात दिसून आला. एका जखमी रूग्णाला रूग्णवाहिकेतून (क्र.एम.एच.१४- सी.एल.११३५) उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात आणण्यात आले होते. १०८ रूग्णवाहिका आल्यानंतर रूग्णालयातील कर्मचाऱ्यांनी स्ट्रेचर घेऊन रूग्णाला अतिदक्षता विभागात नेण्यासाठी पुढं येणे अपेक्षित होते. मात्र, कोणी कर्मचारी संबंधित रूग्णाला घ्यायला पुढे आला नाही. त्यानंतर जखमीच्या एका नातेवाईकानेच स्ट्रेचर बाहेर आणले. रूग्णवाहिकेतून बाहेर पडण्यासाठी रूग्णाला साधारणत: सात ते आठ मिनिटे लागली. तोपर्यंत स्ट्रेचर उन्हाने तापून गरम झाले होते. रूग्णाने स्ट्रेचवर हात ठेवला आणि ते पोळू लागले. त्यामुहे तो स्ट्रेचवर एका बाजूला बसून राहिला. स्ट्रेचवर बेडशिट नसल्याने व ते पोळू लागल्याने रूग्णाने त्यावर झोपण्यास नकार दिला. तेथे उपस्थित एका वयोवृध्द महिलेने हातातील ओढणी स्ट्रेचवर टाकल्यानंतर तो रूग्ण स्ट्रेचरवर झोपला. शेवटी नातेवाईकांनीच ते स्ट्रेचर अतिदक्षता विभागात दाखल केले. जालना येथील जिल्हा रूग्णालयात आलेल्या रूग्णाला स्ट्रेचरवर घेऊन जाताना नातेवाईक़ समवेत हातात सलाईनची बाटली घेऊन उभारलेली महिला.
रूग्णवाहिकेतून येणाऱ्या रूग्णाला अतिदक्षता विभागात नेण्यासाठी जिल्हा रूग्णालयातील कर्मचारी कार्यरत आहेत. शिवाय १०८ चे कर्मचारीही मदत करतात. काही वेळा नातेवाईक स्वत:हून स्ट्रेचर घेऊन रूग्णाला डॉक्टरांकडे नेतात. रूग्णांची, नातेवाईकांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ नये, याची दक्षता आम्ही घेत आहोत. - डॉ. एम.के.राठोड, जिल्हा शल्यचिकित्सक