लोकमत न्यूज नेटवर्कजालना : इमानदारीने, प्रामाणिकपणाने बोलण्याची आणि लिहिण्याची प्रक्रिया घडली तरच समाजाचे मानसिक परिवर्तन होईल, असे प्रतिपादन प्रसिध्द हिंदी साहित्यिक आणि ज्येष्ठ समीक्षक डॉ.सूर्यनारायण रणसुभे यांनी शनिवारी येथे आयोजित ‘अग्निपुष्प’ कादंबरीच्या हिंदी आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात बोलताना केले.प्रसिध्द साहित्यिक रेखा बैजल यांनी मराठीत लिहिलेल्या ‘अग्निपुष्प’ या कादंबरीचे हिंदी भाषांतर त्यांचे पती शिवकुमार बैजल यांनी केले. हिंदी भाषा दिनाचे औचित्य साधत शनिवारी या कादंबरीचे अनावरण करण्यात आले. अध्यक्षस्थानी समीक्षक डॉ. राम अग्रवाल हे होते. प्रारंभी शिवकुमार बैजल यांनी प्रास्ताविकातून ‘अग्निपुष्प’चे हिंदी भाषांतर कशामुळे केले. याचे विवेचन केले. व्यासपीठावर रेखा बैजल, राम अग्रवाल, सुरेश अग्रवाल आदींची उपस्थिती होती. पुढे बोलताना डॉ. रणसुभे म्हणाले की, साहित्यातून मानवी मूल्यांची उदात्तता परिवर्तित होत असते. ही मूल्ये एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरण होतात. अंतर्मनातील चलबिचल साहित्यातून मांडता येते. हे मांडण्यासाठी मोठे धाडस लागते. जे मनात असते तेच शब्दरूपातून त्याला ताकद देणारेच साहित्यिक होऊ शकतात, असेही ते म्हणाले. आज देशाच्या कुठल्याच राज्याची अथवा प्रदेशाची मातृभाषा नसणारी हिंदी भाषा ही भारताची जनभाषा बनली आहे. शंभर कोटी लोक हिंदीचा उपयोग आपल्या व्यवहारासाठी करतात, ही हिंदी भाषेसाठी गौरवाची बाब आहे. देशाच्या अखंडतेसाठी देखील हिंदी भाषेचे मोठे महत्त्व आहे. प्रत्येक यशस्वी व्यक्तीमागे एक स्त्री असते, असे म्हणण्याची परंपरा आहे. परंतु, येथे पतीच्या रूपाने शिवकुमार बैजल यांनी रेखा बैजल यांना मोठी साथ दिल्याचे त्यांनी कौतुक केले.प्राचार्य राम अग्रवाल यांनी अध्यक्षीय समारोप केला. रेखा बैजल यांच्या कथा, कादंबºया आणि कविता या प्रेरणादायी असल्याचे ते म्हणाले. सूत्रसंचालन प्रतिभा श्रीपत यांनी केले. कार्यक्रमास समाजातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती, साहित्यिक उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर हिंदी कवी संमेलन उत्तरोत्तर रंगत गेले.
रेखा बैजल यांच्या ‘अग्निपुष्प’ कादंबरीच्या हिंदी आवृत्तीचे प्रकाशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 12:01 AM