लोकमत न्यूज नेटवर्कजालना : गेल्या अनेक वर्षांपासून मोडकळीस आलेल्या जिल्हा परिषद शाळांच्या इमारत दुरूस्तीला ४ कोटी ५५ लाख रूपयांचा निधी मिळाला असून, यातून जिल्ह्यातील ८२ शाळांची दुरूस्ती करण्याचे काम सुरू आहे. या निधीतूनच मुलींच्या स्वच्छतागृहाची कामेही करण्यात येणार आहे.जिल्हा परिषदेच्या शाळा शासनाच्यावतीने डिजिटल शाळा व हायटेक बनविण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. मात्र, जालना जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांच्या इमारतींना दुरूस्ती अभावी अखेरची घरघर लागली आहे. नवीन शैक्षणिक वर्ष काही महिन्यांवर आले आहे. जालना जिल्ह्यात जिल्हा परिषद अंतर्गत १५१४ शाळात येतात. त्यापैकी सध्यास्थितीत जिल्ह्यात असलेल्या ३५० शाळा मोडकळीस आल्या आहेत. त्यातील काही शाळांना नवीन वर्गखोल्यांची गरज आहे. नवीन वर्गखोल्या, मोडकळीस आलेल्या शाळांची दुरूस्ती, स्वच्छतागृृहांची बांधकामे करण्याबाबतचा प्रस्ताव अनेकवेळा शासनाला देण्यात आला. परंतु, शासनाने मागणी करूनही निधी दिला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोडकळीस आलेल्या शाळांमध्ये शिक्षण घ्यावे लागत आहे. यावर अनेकवेळा सर्वसाधारण सभेत शाळांची दुरूस्ती व नवीन वर्गखोल्याबाबत चर्चा झाली. परंतु, तरीही याकडे दुर्लक्ष करण्यात आले. अखेर शासनाने १७ जानेवारी रोजी जिल्ह्यातील मोडकळीस आलेल्या शाळांची दुरूस्ती करण्यासाठी ४ कोटी ५५ लाख रूपयांचा निधी दिला आहे.८२ वर्गखोल्यांसाठी शासनाने ४ कोटी ५५ लाख रूपयांचा निधी १७ जानेवारीला पाठवला आहे. त्यानुसार कामे सुरू करण्यात आली असून, हा निधी ३१ मार्चपर्यंतच खर्च करायचा आहे.त्यामुळे २२ दिवसात वर्गखोल्यांच्या दुरूस्तीची कामे करायची आहे. ३१ मार्चनंतर सदर निधी परत जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
मोडकळीस आलेल्या ८२ शाळांची दुरूस्ती सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2020 12:09 AM