बाबासाहेब म्हस्के ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी संपादित केल्या जाणाऱ्या जालना तालुक्यातील पाच गावांमधील जमिनीचे फेरमूल्यांकन होणार आहे. बाजार भावापेक्षा कमी दर मिळाल्याचे सांगत या गावातील शेतक-यांनी महामार्गासाठी जमीन संपादनास विरोध केला आहे.समृद्धी महामार्गासाठी जालना तालुक्यातील आंबेडकरवाडी, निधोना, गुंडेवाडी, तांदुळवाडी, जामवाडी, पानशेंद्रा, अहंकार देऊळगाव, नंदापूर, थार, कडवंची या गावांमधील जमिनीचे संपादन केले जाणार आहे. पैकी थेट वाघाटाघाटीने जमीन खरेदीसाठी सर्व गावांमधील जमिनीचे दर प्रशासनाने जाहीर केले आहे. दर जाहीर झाल्यानंतर अनेक शेतक-यांच्या जमिनीचे खरेदीखत पूर्ण झाले असून, शेतक-यांना मोबदलाही देण्यात आला आहे.मात्र, आंबेडकरवाडी, निधोना, तांदूळवाडी, गुंडेवाडी व जामवाडी येथील शेतक-यांनी दर निश्चित समितीने जाहीर केलेला प्रतिहेक्टरी दराऐजवी प्रती चौरस मीटर दराने वाढीव मोबदल्याची मागणी केली आहे. या गावांमधील जमीन शहरालगत असून, अकृषक क्षेत्राला लागून आहे. त्यामुळे शहरी भागातल्या जमिनीप्रमाणे बाजार भावाच्या चार पट मोबदला मिळावा, अशी मागणी या भागातील शेतक-यांनी केली आहे. त्यामुळे आंबेकरवाडी, जामवाडी येथील एकाही शेतक-याने अद्याप समृद्धीसाठी जमीन दिलेली नाही. काही दिवसांपूर्वी आंबेडकरवाडी येथे संयुक्त मोजणीसाठी गेलेल्या पथकाला शेतक-यांनी मोजणी न करू देताच परत पाठवले होते. त्यामुळे जिल्हा प्रशासनासह रस्ते विकास महामंडळासमोर नवा पेच निर्माण झाला आहे. जमिनीला प्रति चौरस मीटर दर देण्याची शेतकºयांची मागणी अव्यवहार्य असल्याचे वरिष्ठ अधिकारी सांगत आहेत. मात्र, मार्चअखेर समृद्धी महामार्गासाठीच्या जमिनीचे संपादन करावयाचे असल्याने प्रशासनाने या गावांमधील जमिनीचे फेरमूल्यांकन करण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. फेरमूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यास या तिन्ही गावातील जमिनीचे नवे दर निश्चित करून त्याची माहिती गावातील ग्रामपंचायत कार्यालयात लावली जाईल, असे सूत्रांनी सांगितले.जामवाडी, गुंडेवाडी, तांदुळवाडी गावांमधील समृद्धीसाठी संपादित करावयाच्या जिरायती जमिनीसाठी एकरी १५ लाख, हंगामी बागायती जमिनीसाठी २० लाख व बागायती जमिनीसाठी ३० लाखांचा दर निश्चित करण्यात आला आहे. मात्र, जालना बाजार समितीला लागून असलेल्या गुंडेवाडी, जामवाडी शिवारातील जमिनीला प्रती चौरस मीटरचा दर द्यावा, अशी मागणी शेतक-यांमधून केली जात आहे. शेतक-यांच्या याच मागणीसाठी मागील आठवड्यात पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी मंत्रालयात रस्ते विकास महामंडळाच्या वरिष्ठ अधिका-यांसोबत बैठक घेतली. शेतक-यांच्या मागणीचा सकारात्मक विचार करावा, अशा सूचना त्यांनी संबंधित अधिका-यांना दिल्या होत्या.
पाच गावांत होणार फेरमूल्यांकन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 12:37 AM