लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यातील पाच विधासभा मतदारसंघात जालना वगळता अन्य चार विधानसभा मतदारसंघात १६ पेक्षा कमी उमेदवार असल्याने तेथे एकच बॅलेट युनिट लागणार आहे. परंतु जालना विधानसभेच्या रिंगणात ३२ उमेदवार रिंगणात असल्याने येथे तीन बॅलेट युनिट लागणार आहे. नोटा साठी स्वतंत्र बॅलेट युनिट ठेवण्याची गरज पडणार असल्याचे चित्र आहे.एका बॅलेट युनिटवर १५ उमेदवारांचे नाव आणि एक नोटाचे बटन असते. परंतु जालन्यात ही स्थिती बदलली आहे. या विधानसभा क्षेत्रात ३२ उमेदवार असल्याने येथे तीन बॅलेट युनिट ठेवाव्या लागणार आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर तीन बॅलेट युनिट आणि एक व्हीव्हीपॅट मशीन राहणार आहेत. जालना विधानसभेत एकूण जवळपास ३१८ मतदान केंद्रे आहेत. जवळपास तीन लाख ३२ हजार मतदार आहेत. जिल्हा प्रशासनाने पाचही विधानसभा मतदारसंघासाठी मिळून बॅलेट युनिटची संख्या तीन हजार ५७ एवढी आहे. त्यातील निम्म्या मशीन एकट्या जालना विधानसभा मतदारसंघात लागणार आहेत. एकूणच आता प्रशासनाकडून निवडणुकीची जय्यत तयारी करण्यात येत आहे.
जालन्यासाठी लागणार ३ बॅलेट युनिट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2019 12:53 AM