जालना : जातवैधता प्रमाणपत्रासाठी ३५ हजारांची लाच स्वीकारणाऱ्या जात पडताळणी समिती कार्यालयातील कंत्राटी संशोधक सहायकास लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने जेरबंद केले. ही कारवाई सोमवारी जिल्हा जाती प्रमाणपत्र प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयात करण्यात आली.
राहुल शंकर बनसोडे (वय ४३, रा. पंचशीलनगर, मोंढा नाका, छत्रपती संभाजीनगर) असे कारवाई झालेल्या संशोधक सहायकाचे नाव आहे. ओबीसी प्रवर्गातील एका तक्रारदाराने ८ ऑगस्ट २०२२ रोजी दोन मुलांचे तेली जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी जात पडताळणी समितीकडे अर्ज केला होता. त्यावेळी कंत्राटी संशाेधक सहायक राहुल बनसोडे यानी त्या अर्जात त्रुटी असल्याचे सांगत एका मुलाचे २० हजार प्रमाणे ४० हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती.
त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पंचांसमक्ष पडतळणी केली. त्यावेळी तडजोडीअंती ३५ हजार रुपये मागण्यात आले. त्यानुसार पथकाने सोमवारी जात पडताळणी समिती कार्यालय परिसरात सापळा रचला. त्यावेळी तक्रारदाराच्या कामासाठी राहुल बनसोडे यानी ३५ हजार रुपयांची लाच स्वीकारल्यानंतर कारवाई करण्यात आली. या प्रकरणात रात्री उशिरापर्यंत कदीम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. ही कारवाई एसीबीचे अधीक्षक संदीप अटोळे, अपर पोलिस अधीक्षक विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली उपाधीक्षक किरण बिडवे, ज्ञानदेव जुंबड, गजानन घायवट, गणेश बुजाडे, शिवलिंग खुळे, गणेश चेके, शिवाजी जमधडे, कृष्णा देठे, गजानन खरात, गजानन कांबळे, संदीपान लहाने, जावेद शेख, विठ्ठल कापसे, बनोरकर यांच्या पथकाने केली.