अंतरवली- गेल्या काही दिवसापासून अंतरवली सराटी येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावं, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरू केलं आहे. पाटील यांनी सरकारला ४० दिवसांचा वेळ दिला आहे. या पार्श्वभूमीवर आज अंतरवली सराटी येथे भव्य सभेचे आयोजन केलं आहे. १०० एकर जागेत ही सभा होणार आहे. या सभेसाठी राज्यभरातून मराठा बांधव आले आहेत. या सभेपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांना प्रतिक्रीया दिली.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, मराठा समाजाची आज १२ वाजता सभा सुरू होणार आहे. ही गर्दी आमच्या वेदना आहेत. मुल शिकून मोठी होतात पण नोकरीपासून वंचित राहत आहेत. आमच्यासाठी हा सुवर्णक्षण आहे. राज्यातील मराठा समाज एकत्र आलाय. सरकारच्या हातात आजपासून दहा दिवस आहेत. आज मराठा समाज शांततेत आला आणि शांततेत गेला, हा पायंडा आम्ही पाडणार आहे. आम्हाला आरक्षण पाहिजे, राहिलेल्या दहा दिवसात सरकारने आरक्षण दिले पाहिजे. आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय शांत बसणार नाही, असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला.
"आता सभेला आलेली गर्दी पाहून आकडा सांगणे कठीण आहे. सभेसाठी जमलेली गर्दी ही सगळी वेदना आहे. या समाजाचा प्रश्न सरकारने मार्गी काढावा. दहा दिवस राहिले आहेत, आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय शांत बसणार नाही. आज सभा संपल्यानंतर समाज शांततेत घरी जाणार आहे, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले.
Israel-Hamas War : भारताचे 'ऑपरेशन अजय', इस्रायलहून दुसरे विमान २३५ भारतीयांना घेऊन दिल्लीला पोहोचले
मनोज जरांगे पाटील म्हणाले, आम्ही शेतकरी आहोत, सामान्य घरातील आम्ही आहोत. आम्ही या सभेचे नियोजन एकत्र येऊन केलं आहे. राज्यकर्त्यांनी एक मराठा, लाख मराठा स्वार्थासाठी म्हणायचं, असा आरोपही केला. समाजातील मनातील भूमिका मा मांडत आहे. ही गर्दी त्यासाठीच आली आहे. सगळ्यांनी समाजासोबत राहिले पाहिजेत. गोरगरीब मुलांचं चांगलं झालं पाहिजे, असंही जरांगे-पाटील म्हणाले.