ग्रामस्थांचे जिल्हा कचेरीसमोर उपोषण
परतूर : परतूर तालुक्यातील आष्टी ग्रामपंचायतीच्या गैरकारभार, अपहार, अनियमिततेसंदर्भात तक्रारी करूनही जालना जिल्हा परिषद प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. तक्रार करूनही कारवाई होत नसल्याने, अन्यायग्रस्त नागरिकांनी जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर २५ जानेवारी रोजी उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. या निवेदनावर सोमनाथ नागनाथ शेटे, सुंदर त्र्यंबक सवने, अजिम अकबर पटेल, सिलदारखाँ सिलदार, मेहमूद पठाण, सीताराम विश्वनाथ खंगले, सय्यद इब्राहिम आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
कॉमर्स कार्यकारिणीची आज बैठक
जालना : मराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड अँड कॉमर्सच्या कार्यकारिणी सदस्यांची बैठक रविवारी मधुर बॅक्वेट येथे संघटनेचे अध्यक्ष प्रफुल्ल मालाणी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे. तत्पूर्वी सकाळी ११ वाजता जालना जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीने जिल्हा, ग्रामीण, तालुका, शहर संघटना व असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसाठी व्यापारविषयक विविध विषयांवर तज्ज्ञ व्यक्तींकडून मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये मराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड अँड कॉमर्सचे माजी अध्यक्ष सत्यनारायण लाहोटी हे ‘संघटित असण्याचे महत्त्व’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले.
अवैध धंद्यांवर कारवाई करण्याची मागणी
भोकरदन : शहरासह ग्रामीण भागात अवैध दारूविक्री जोमात सुरू आहे. तळीरामांमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असून, महिला, मुलींना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, तरी राज्य उत्पादन शुल्क विभाग, पोलिसांनी अवैध धंद्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
ऊस उत्पादकांची बैठकीत चर्चा
परतूर : तालुक्यातील कोकाटे हदगाव येथे बागेश्वरी साखर कारखान्याच्या वतीने ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बैठक घेऊन मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी शेतकी अधिकारी खंदारे, ऊस पुरवठा अधिकारी सोळंके, सुपरवायझर जाधव, पी.के. पवार, पोटे, माजी उपसभापती प्रदीप ढवळे, बाळू ढवळे, प्रकाश ढवळे, नागेश ढवळे, बिट्टू ढवळे, भुजंग ढवळे, रोहिदास टेलर आदींची उपस्थिती होती. परतूर तालुक्यात ७ लाख टन ऊस असून, येत्या काही दिवसांत ऊस तोडणीचा कार्यक्रम लावण्यात येईल. एका टोळीला एकच चिठ्ठी दिली जाईल, कुणावरही अन्याय होणार नाही, असे बागेश्वरी कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
बारसवाडा येथे विद्यार्थ्यांचा सत्कार
अंबड : तंबाखूमुक्त शाळा अभियान कार्यक्रमांतर्गत डोणगाव केंद्राची बैठक अंबड तालुक्यातील बारसवाडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत घेण्यात आली. यावेळी केंद्रप्रमुख रमेश फटाले तर प्रमुख पाहुणे म्हणून जामखेड केंद्रप्रमुख शेख, निर्माण विकास संस्थेचे विजय बनसोडे, मुख्याध्यापक अशोक बांगर, मोमीन यांची उपस्थित होती. यात विद्यार्थी व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
भोजने यांची सीमा सुरक्षा दलात निवड
जालना : घनसावंगी तालुक्यातील रामसगाव येथील शुभम भोजने यांची भारतीय सैन्यदलाच्या सीमा सुरक्षा दलात निवड झाली आहे. या निवडीबद्दल प्रवीण भोजने, भास्कर भोजने, आई-वडील व कुटुंबासह ग्रामस्थांनी कौतुक केले आहे.